
Satara News : साडेचार कोटींचा निधी गणवेशासाठी अपेक्षित
सातारा : समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो.
यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांला गणवेश वाटप करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांकरिता प्रतिविद्यार्थी ६०० रुपये गणवेश प्रमाणे साडेचार कोटींचा निधी अपेक्षित आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. प्रतिगणवेश तीनशे रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी प्रतिविद्यार्थी सहाशे रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
त्यासाठी शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेकडे पुढील वर्षी या योजनेंतर्गत गणवेशाचा लाभ देण्यासाठी नोंदणी पूर्ण केली जात आहे. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च केला जातो. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग केला जातो.
कोविडच्या काळात दोन वर्ष ऑनलाइन वर्ग भरल्याने गणवेश देण्यात आले नव्हते. मात्र, मागील वर्षी कोविडचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश वाटप करण्यात आले होते. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुमारे ८३ हजार २४९ विद्यार्थी मोफत गणवेशाचे लाभार्थी झाले होते. यासाठी सुमारे पाच कोटी निधी खर्च करण्यात आला होता. यंदा सुमारे ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र असल्याने त्यासाठी सुमारे साडेचार कोटींहून अधिक निधीची शिक्षण विभागाला लागणार आहे.
गणवेशाची मापे देण्याची सूचना
यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे शिलाई कारागिरांकडून घेण्यात यावीत, अशा सूचना समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण परिषदेने जिल्हास्तरावर दिल्या आहेत.