Satara Crime News : मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर; पोलिसमामा, टवाळखोरांवर कारवाईसाठी दंडुका हातात घ्याच!

सांगवी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे तालुक्यातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवरsakal

- अशपाक पटेल

शिरवळ : सांगवी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे तालुक्यातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक शाळकरी मुली व युवती भीतीच्या सावटाखाली आल्या आहेत. मुलींना शाळा, महाविद्यालयात पाठवणे किंवा एकटीला गावाला पाठवण्याबाबत आईवडिलांच्या मनात या घटनेने प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांचा टवाळांवर असलेला वचक कमी झाल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे ठोस उपाययोजना राबवत परिसरातील नागरिक विशेषत: महिला व मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आव्हान पोलिस दलासमोर आहे.

शिरवळला हवे पोलिस उपविभागीय कार्यालय

शिरवळ शहरात १३९ कंपन्या, मस्जिद व दर्गाह सात, तर मंदिरे ९३ तसेच परिसरातील गावे एकूण ३०, तसेच महाविद्यालये, अनेक शाळा, इतर विभाग कार्यरत आहेत. या शहरात जवळपास ३५ ते ४० हजार लोकसंख्या आहे,

तसेच पुणे- बंगळूर महामार्ग, नीरा नदी परिसर, वीर धरण व मुख्य बाजारपेठ पाहता येथे पोलिस उपविभागीय कार्यालय असणे अंत्यत आवश्यक आहे. सध्या फलटण उपविभागीय विभागात हे पोलिस ठाणे असल्याने फलटणवरून कार्यभार सांभाळणे जिकिरीचे होत असल्याचे दिसत आहे.

महिला कर्मचारी कमी

सध्या या पोलिस ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षक एक, सहायक पोलिस निरीक्षक एक, पोलिस उपनिरीक्षक पाच, कर्मचारी ४३ असा मोठा स्टाफ येथे कार्यरत आहे. यामध्ये केवळ सात महिला पोलिस कर्मचारी आहेत.

स्वसंरक्षणाचे हवेत धडे

शाळा, महाविद्यालयातील मुली व कंपनी तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना हवे स्वसंरक्षणाचे धडे देणे तसेच मोटिव्हेशन करणे गरजेचे आहे. तसेच शालेयस्तरावर सुरक्षितता पथक कार्यरत करणे महत्त्वाचे आहे.

पोलिसांचा हवाय वचक

दिवसाढवळ्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांचा वचक किती? असा प्रश्न उपस्थित राहत असल्याने अशा घडणाऱ्या घटनेवेळी पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे. जनतेचा विश्वास जिंकणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.

पाच पोलिस ठाण्यांसाठी केवळ एकच निर्भया पथक

फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद, खंडाळा व शिरवळसाठी केवळ एकच निर्भया पथक कार्यरत आहे. यामुळे निर्भया पथकाच्या कामावर मर्यादा येतात. परिणामी, मुलींना आपली अडचण सांगणे अवघड जाते. शिरवळ-खंडाळा परिसरातील शाळा- महाविद्यालयांवर असणारा पथकाचा वावर त्यामुळे कमी होत आहे.

आपले म्हणणे मांडायचे तरी कोणाकडे?

छेडछाड, विनयभंग, दमदाटी, धमकी व इतर गोष्टींबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी नेमके कोणाकडे जावे? ती व्यक्ती महिला आहे का? माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न युवतींसमोर असतात.

परिणामी, आपले म्हणणे मांडण्यापेक्षा सहन करण्यापलीकडे पर्याय नसल्याने अनेक प्रकार घडत असतात. मात्र, याची चर्चाही होत नाही. म्हणून महिलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या ठिकाणी होतेय छेडछाड!

  • एसटी बस स्थानक

  • महाविद्यालय परिसर

  • मुख्य बाजारपेठमधील चाट खाणाऱ्या गाड्यांवर

  • हॉटेलमध्ये

  • महामार्ग, सेवारस्त्यावर

  • घरी परतताना निर्जनस्थळी

  • नीरा नदी पूल व वीर धरण परिसर

  • महामार्गावरील थांब्यावर

महिला किंवा युवती तसेच शाळकरी मुली यांच्यावर कोणीही वाकडी नजर ठेऊन छेडछाड केली, तर कोणाचीही तमा न बाळगता यापुढे कडक कारवाई करणार आहे.

- नवनाथ मदने, पोलिस निरीक्षक, शिरवळ

सध्या पोलिसांनी गणवेशात राहून गर्दीच्या ठिकाणी पहारा द्यावा व छेडछाडीच्या घटना नजरेत पडल्यास तत्काळ पोलिसांनी कारवाई करावी. यामुळे पोलिसांचा वचक राहील.

- छायाताई जाधव, माजी सरपंच, शिरवळ ग्रामपंचायत

शाळा, महाविद्यालयातील फलकावर निर्भया पथकाचा तसेच महिला पोलिसांचा मोबाईल नंबर लावावा. यांना मिसकॉलही आल्यास त्वरित दखल घेऊन कारवाई व्हावी.

- लक्ष्मीताई पानसरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत शिरवळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com