
या ग्रामस्थांचे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांनी कौतुक करून शाबासकीची थाप द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कलेढोण (जि. सातारा) : जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना गावात 1972 पासूनची बिनविरोधची परंपरा कायम करण्याचा गुंडेवाडी (मराठानगर) ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांनी गावास शाबासकी देऊन कौतुकाची थाप टाकावी, अशी मागणी गुंडेवाडीकरांनी केली आहे.
खटाव तालुक्यातील येरळा नदीकाठावरील गुंडेवाडीकरांनी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय कायम केला आहे. 1972 पासून ग्रामपंचायत ही बिनविरोध होत आहे. या परंपरेची 48 वर्षे ग्रामपंचायत पूर्ण करीत आहे. आठवड्यापासून गावात बिनविरोधची चर्चा सुरू होती. अखेर सर्व ग्रामस्थांनी एकमताने बिनविरोधचा निर्णय कायम केला आहे. दर वेळी नवीन सरपंच व नवीन सदस्याला संधी ही गावाची परंपरा आहे. सर्व ग्रामस्थांनी सामंजस्याने निर्णय घेत आपली जुनी प्रथा कायम केली. नुकत्याच झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी गावाने मराठानगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास काही अंशी यश आले असून, त्याबाबतचा शासनाचा अंतिम निर्णय बाकी आहे.
म्हसवड : श्री नागोबा देवाची यात्रा यंदा रद्द; पाच जानेवारीपर्यंत मंदिर राहणार बंद
Video : आश्चर्य..! सूर्याचीवाडीत चक्क पट्टेरी हंस; फ्लेमिंगोचे आगमन लांबले
गावात ग्रामदैवताची मंदिरे उभारणे, दारूबंदी, येरळा नदीत सामूहिक वर्गणी काढून पिण्याची पाण्यासाठी विहीर खोदणे, पाइपलाइन करणे, स्वच्छता ठेवण्यात ग्रामस्थ आघाडीवर असतात. सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवर 48 वर्षांपासून बिनविरोधचा झेंडा ग्रामस्थांनी कायम केला आहे. या ग्रामस्थांचे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांनी कौतुक करून शाबासकीची थाप द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
""गावाने 1972 पासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून जिल्ह्यासमोर आदर्श ठेवला आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रशासनाने सत्कार करून ग्रामस्थांच्या या निर्णयाचे बक्षीस देऊन पाठीवर शाबासकीची थाप टाकावी, अशी आम्हा गावकऱ्यांची मागणी आहे.''
- पूनम निकम, माजी सरपंच
Edited By : Siddharth Latkar