esakal | पिंपोड्यात 65 हेक्‍टर पिकांची मोठी हानी; शेतकऱ्यांना अश्रू अनावर
sakal

बोलून बातमी शोधा

esakal

पिंपोड्यात 65 हेक्‍टर पिकांची मोठी हानी; शेतकऱ्यांना अश्रू अनावर

sakal_logo
By
राहुल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तरेकडील भागात काल झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात मोठा भांडवली खर्च करून जगवलेली पिके वाया गेली आहेत. पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, दहिगाव, घिगेवाडी, वाघोली, अनपटवाडी या परिसरातील 65 हेक्‍टरांवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

अचानक आलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने कलिंगडे, गोट कांदा, ऊस, शिमला मिरची, सितारा मिरची, गहू, भुईमूग, पपई, डाळिंब, मका तसेच तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. झाडांना लगडलेल्या कैऱ्या जमीनदोस्त झाल्या. शेतात अर्धा फूट साचलेला गारांचा थर आज सकाळपर्यंत विरघळला नव्हता. यावरून या गारपिटीची भीषणता लक्षात येते. गारांमुळे उरली सुरली पिकं अक्षरशः नासून गेलीत. गोट कांद्याच्या फुलांचा जमिनीवर खच पडला होता. त्यातील बी मातीत झडले आहे. उसाच्या पानांच्या तर चिंध्या झाल्या आहेत. शेतातील मोठमोठी झाडे बोडकी झाली आहेत. लाखो रुपयांचा केलेला खर्च मातीमोल झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

कोरेगाव तालुक्‍यात काश्मीरची झलक; पिंपोडेसह वाठारला गारांचा खच

दरम्यान, आमदार दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकार दरबारी आवश्‍यक असलेली सर्व कार्यवाही मी स्वतः तातडीने करीन, अशी ग्वाही आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिली. या वेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, सरपंच नैनेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, मंडलाधिकारी उमेश डोईफोडे, तलाठी सुहास सोनावणे, धनसिंग साळुंखे, दिलीप लेंभे, हमीद इनामदार, इलाही इनामदार, शिवाजी निकम, अशोक निकम, माजी सरपंच मछिंद्र केंजळे यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top