ढेबेवाडी बाजारात पावसाने दाणादाण; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ढेबेवाडी बाजारात पावसाने दाणादाण; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ढेबेवाडी (जि. सातारा) : कोरोनाच्या संसर्गामुळे तब्बल सात महिन्यांपासून बंद ठेवलेला येथील आठवडा बाजार पुन्हा सुरू झाला. मात्र, दीर्घ प्रतीक्षेनंतर बाजारात खरेदी- विक्रीस आलेल्या व्यापारी व ग्राहकांची पावसाने दाणादाण उडवून दिली. येथे कोरोनाचा संसर्ग सुरूच असतानाही सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर याबाबत बाजारातील गर्दीमध्ये फारशी जागरूकता दिसून आलीच नाही. 

पाटण तालुक्‍यातील मोठ्या आठवडा बाजारांमध्ये येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराचा समावेश होतो. कऱ्हाड- पाटणसह विविध तालुक्‍यांतून ग्राहक व विक्रेते बाजारासाठी येतात. भाजीपाला, कांदा- बटाटा, धान्य, कोंबड्या- बकरी, खाद्यपदार्थ, मटण- मासळी आदी व्यवसायातून आर्थिक उलाढाल होते. मार्चपासून फैलावत चाललेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाजार बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या होत्या, तरीही सुरवातीला दोन- तीन आठवडे मनमानी आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करत बाजार भरतच होता. त्यानंतर ग्रामपंचायत, पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेने खास लक्ष घालून बाजार भरणार नाही यासाठी काळजी घेतली होती. 

आता तब्बल सात महिन्यांनंतर बाजाराला परवानगी मिळाल्याने मंगळवारी सकाळपासून विक्रेते व ग्राहक येथे येण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत खरेदीसाठी नागरिकांची बऱ्यापैकी गर्दी होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर याबाबत फारशी जागरूकता दिसून आली नाही. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने ग्राहक व विक्रेत्यांची धावपळ उडाली. विक्रीस आणलेला माल रस्त्यावरच सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. पावसामुळे विक्रीस आणलेल्या मालाचे पावसाने भिजून नुकसान झाल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. ढेबेवाडी परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली असून, डोंगर भागात सुरू असलेल्या भात व भुईमूग काढणीवर पाणी फिरल्याने तेथील शेतकऱ्यांवर आभाळच कोसळले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com