esakal | केळघर, पाटणात मेघगर्जनेसह दमदार पाऊस; वादळात उडाले घरांचे पत्रे
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

केळघर, पाटणात मेघगर्जनेसह दमदार पाऊस; वादळात उडाले घरांचे पत्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटण (सातारा) : सलग आठ दिवस हुलकावणी दिलेल्या वळिवाच्या पावसाने (Heavy Rain) आज सायंकाळी दमदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह विजांच्या कडकटाडात पाऊस पडला. वादळी वारे नसल्याने पाऊस बराचकाळ सुरू होता. खरीपपूर्व मशागतीसाठी हा पाऊस उपयोगी असून, मशागतीच्या कामांना वेग येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि वळिवाचा पाऊस सुरू झाला. साधारण एक तासाहून जास्त कालावधी पाऊस पडत होता. ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट दमदार पावसात सुरू होता. पाटण, केरा विभाग, येरफळे, म्हावशी, अडुळ, नवारस्ता, नाडोली, सांगड, चोपडी, मरळी, सोनवडे परिसरात दमदार पाऊस पडला. पावसामुळे वीटभट्टींचे नुकसान झाले. (Heavy Rain In Patan Kelghar Area Satara News)

वाटंबेत वादळामुळे सात घरांचे पत्रे उडाले

केळघर : केळघर परिसरात आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वाटंबे येथे आज दुपारी वादळामुळे सात जणांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, वादळामुळे विजेचे चार खांबही जमीनदोस्त झाले आहेत. वादळामुळे वाटंबे येथे घरावरील पत्रे उडून, तसेच कौले फुटून मोठे नुकसान झाले आहे. आज परिसरात दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान जोरदार पावसास सुरुवात झाली. वाटंबे येथे वादळामुळे नवनाथ कांबळे, सुनील कांबळे, दिलीप कांबळे, मोहन कांबळे, श्रीरंग कांबळे, जगाबाई कांबळे, भिकू कांबळे, अशोक कांबळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, कौले फुटूनही नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी मकरध्वज डोईफोडे व ग्रामसेवक एन. के. जाधव यांनी केला आहे. या वादळामुळे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या वादळात विजेचे चार खांबही पडले आहेत.

साताऱ्यात वादळी वाऱ्यासह धुवांधार; गोंदवले, दहिवडी, कातरखटावात पिकांचे नुकसान

Heavy Rain In Patan Kelghar Area Satara News