ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार औंधचा 'काजळवड' कोसळला!

बाळकृष्ण मधाळे/ शशिकांत धुमाळ
Thursday, 30 July 2020

एका रात्रीत एखादा माणूस निसर्गाची विस्कटलेली घडी ठीक करू शकत नाही; पण प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून कार्यास सुरुवात केली की काही काळाने त्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे दिसून येतो, त्यामुळे औध येथे मोठ्या प्रमाणात वडाची झाडं लावली जावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून जोर धरू लागली आहे.
 

सातारा : 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग लताबाईंच्या सुमधुर आवाजात ऐकताना आपल्या सभोवताली अरण्यच साकारल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. इतके सामर्थ्य या अभंगात आहे. तुकारामांचा काळ हा निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर वनश्री असणा-या, जवळपास चारशे वर्षापूर्वीचा काळ होता. निसर्गाला आजच्याइतका ओढग्रस्तीचा काळ नव्हता, तरीही आपले संत निसर्गाप्रती आपला कृतज्ञभाव व्यक्त करतात; पण आजच्या काळात आपण वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वत्र निसर्गाचा ऱ्हास करत चाललो आहोत. त्याची आपल्याला ना खंत ना खेद आहे. औंधच्या जडण-घडणीत आणि अनेक घटनांचा साक्षीदार असलेला गावच्या दक्षिणेकडील ऐतिहासिक  'काजळवड' सोमवारी रात्री अचानक कोसळला. यामुळे नागरिक, युवक पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.

औंध-गणेशवाडी  रस्त्यावर असणाऱ्या या काजळवडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. औंंध येथील श्रीयमाईदेवीचे औंध गावात प्रवेश करण्यापूर्वीचे हे आश्रयस्थान होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. पूर्व दिशेकडून औंध गावात प्रवेश करण्यापूर्वी काही काळ याठिकाणी विश्रांती घेऊन देवीने याच वडाच्या झाडाखाली बसून आपल्या डोळ्यात काजळ घातले होते. म्हणून या वडाला काजळवड, असे नाव पडले अशी अख्यायिका आहे. त्यानंतर येथील रणदिवे कुटुंबातील  व्यक्तिंनी काजळाचे दिवे करून देवीला मूळपीठ डोंगरावर नेले होते. मूळपीठ डोंगरावर असणारे हे ठिकाण देवीचे जागृत व स्वयंभू ठिकाण आहे असे सांगितले जाते, त्यामुळे याठिकाणास महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी नवरात्रानंतर सिमोल्लंघनासाठी पालखीची फेरी वाद्यवृंद गजरात काजळवडाजवळ नेहली जाते आणि देवीच्या उत्सवमूर्तीचे पूजन करून , सोने लुटण्याचा कार्यक्रम, गोळीबार करून डब्बे फोडण्याची परंपरा आजही कायम आहे. याठिकाणी संस्थान काळापासून सुरू असलेली परंपरा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राज घराण्यातील मान्यवरांनी आजही जपली आहे.
याठिकाणी देवीचे छोटे मंदिर  काजळवडाखाली बांधण्यात आले आहे.

येथे सापडला अर्धा किलोचा दुर्मिळ प्रजातीचा झिंगा

या तालुक्‍यात पावसाची उघडीप; शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग 
 
दरम्यान, अतिशय डेरेदार असणारा काजळवड अनेक प्रवासी, औंधकरवासियांंची अस्मिता बनला होता; पण सोमवारी रात्री हा वड अचानक कोसळल्याने व त्याच्या फांद्या, झाडांचे इतर अवशेष निखळून पडल्याने औंधच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार कोसळला. मात्र, एका रात्रीत एखादा माणूस निसर्गाची विस्कटलेली घडी ठीक करू शकत नाही; पण प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून कार्यास सुरुवात केली की काही काळाने त्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे दिसून येतो, त्यामुळे औध येथे मोठ्या प्रमाणात वडाची झाडं लावली जावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून जोर धरू लागली आहे.

देवीचे विश्रांतीचे ठिकाण असलेल्या या ऐतिहासिक ठिकाणचा ठेवा जतन करण्यासाठी याठिकाणी नवीन वडांचे रोपण करणार असून आमच्या कुटुंबियांनी जोपासलेला देवीच्या सेवेचा वारसा यापुढे ही जोपासणार आहोत.
- आनंदा रणदिवे, औंध.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर, अखेर 'हा" निर्णय घेतलाच

औंध भागात मोठ्या प्रमाणात वूक्षरोपण करून वनसंपदा वाढविण्याचा ध्यास शिवसंकल्प प्रतिष्ठानने घेतला आहे. यापुढील काळात औध ते गणेशवाडी रस्त्यावरील काजळवड परिसरात विविध जातींची झाडे मोठ्या प्रमाणात लाऊन त्यांची जोपासना करणार आहोत.
- निलेश खैरमोडे, अध्यक्ष, शिवसंकल्प प्रतिष्ठान औंध.

लई भारी...साताऱ्यातील पठ्ठ्याने पाणीपुरी विकून मिळविले दहावीत यश

औंधला समूध्द ऐतिहासिक वारसा आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू औंध परिसरात आहेत. त्याचे जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच औंधचा हा अनमोल ठेवा भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल.प्रेरणेचा स्त्रोत बनेल.
- विकास यादव (इतिहास व पर्यावरणप्रेमी ,औंध)

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historic Banyan Tree Of Aundh Collapsed