Satara: सातारच्या छत्रपती घराण्यात भाऊबंदकी नेमकी सुरू कधी झाली? असा आहे घराणेशाहीचा इतिहास

Satara: सातारच्या छत्रपती घराण्यात भाऊबंदकी नेमकी सुरू कधी झाली? असा आहे घराणेशाहीचा इतिहास

असं म्हणतात की मराठी माणसाला भाऊबंदकीचा शाप आहे. गल्लीपासून दिल्ली पर्यंत असलेली भाऊबंदकी आपल्याला नवी नाही. मात्र एक भाऊबंदकी अशी आहे जी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला क्लेशकारक आहे. ती आहे छत्रपती घराण्यातली भाऊबंदकी.

नुकताच सातारचे खासदार उदयन राजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे जागेच्या वादातून एकमेकांच्या समोर उभे ठाकले.

कार्यकर्त्यांत राडा झाला, अगदी पोलिसांच्या समोर तंगड तोडण्याची भाषा झाली आणि ती उभ्या देशाने टीव्हीवर पाहिली. चुलतभावांमध्ये असलेला हा वाद नेमका काय ? सातारच्या गादीवर भाऊबंदकी नेमकी सुरू कधी झाली?

या भाऊबंदकीची बीजे रोवली आहेत इतिहासात. सातारच्या गादीची स्थापना केली ती शंभुपुत्र शाहू महाराजांनी. महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष करून शाहूमहाराजांनी आपलं साम्राज्य स्थापन केलं.

वारणेचा तह होऊन साताऱ्याची थोरली पाती आणि कोल्हापूरची धाकटी पाती अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. याच थोरल्या पातीचे वारसदार म्हणजे उदयन राजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले.

उदयनराजे यांचे वडील म्हणजे प्रतापसिंह राजे भोसले. त्यांच्या आधी साताऱ्यातील राजघराण्याचे कोणी राजकारणात नव्हते.

Satara: सातारच्या छत्रपती घराण्यात भाऊबंदकी नेमकी सुरू कधी झाली? असा आहे घराणेशाहीचा इतिहास
Karnataka Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲक्सीटेंड होऊन काँग्रेस सरकार कोसळणार; भाजप नेत्याचा दावा

राजमाता सुमित्राराजे यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात लोकसभा लढवण्याची विनंती केली होती असं म्हणतात पण त्यांनी तेव्हा इंदिरा गांधीना नकार दिला. पुढे प्रतापसिंह राजे यांच्या रूपात छत्रपती घराण्याने पहिल्यांदा राजकारणात उडी घेतली.

ते साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झालं. प्रतापसिंहराजेंचा राजकीय वारसा आला त्यांच्या धाकट्या बंधूंच्या कडे म्हणजे अभयसिंहराजे भोसले यांच्याकडे.

अभयसिंह राजे यांनी १९७८ साली जनतादलाकडून विधानसभा लढवली आणि ते पहिल्यांदा आमदार बनले. तिथून पुढे सातारा विधानसभा मतदारसंघावर अभयसिंह राजे यांचंच वर्चस्व राहिलं. पुढे ते कॉंग्रेस मध्ये आले.

मंत्री बनले. राज्यपातळीवर एक अभ्यासू नेता म्हणून अभयसिंहराजे यांचा दबदबा निर्माण झाला. अजिंक्य सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकारक्षेत्रात देखील जम बसवला.

इथूनच सुरवात झाली घराणेशाहीची. अभयसिंहराजे भोसले यांच्यावर पवारांची कृपादृष्टी झाली होती. राज्यात ते महत्वाचे मंत्रिपद उपभोगत होते.

इकडे त्यांच्यात व उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाले. वाढत चाललेली महत्वाकांक्षा, ईर्ष्या, राजकीय असुरक्षिततेची भावना या गोष्टींची एंट्री झाली आणि भरल्या घरात गृहकलह शिरला.

कल्पनाराजे यांना आपल्या मुलाच्या म्हणजेच उदयन राजे यांच्या राजकीय भविष्याची चिंता लागली होती. पतीच्या मृत्यूनंतर आपला हक्क डावलला जातोय अशी त्यांची भावना उफाळून आली आणि सर्व बाजूने एकट्या पडलेल्या राजमातांनी अखेरीस राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

Satara: सातारच्या छत्रपती घराण्यात भाऊबंदकी नेमकी सुरू कधी झाली? असा आहे घराणेशाहीचा इतिहास
Siddaramaiah: महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणा; जतचा पाणी प्रश्न सोडवून टाकू, कर्नाटकच्या मंत्र्याचे आवाहन

साल होतं १९८९. मराठी माणसाचा हक्काचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या शिवसेनेने मुंबईबाहेर आपले पंख पसरण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी बाळासाहेब ठाकरेंनी कल्पनाराजे भोसले यांना साताऱ्यात अभयसिंहराजे यांच्या विरुद्ध शिवसेनेचं तिकीट दिलं.

बलाढ्य अभयसिंह राजे यांच्या समोर कल्पनाराजे यांचं आव्हान कमी पडलं व त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. कल्पनाराजे पराभूत झाल्या मात्र त्यांनी आपल्या मुलासाठी राजकीय पाया रचून ठेवला.

पुढे दोनच वर्षांनी म्हणजे १९९१ साली एंट्री झाली उदयनराजे यांची आणि चित्र बदलायला सुरवात झाली. कल्पनाराजे आणि अभयसिंह राजे यांच्यात शीतयुद्ध सुरू होतं तेव्हा छत्रपती गादीचे वारसदार उदयनराजे भोसले हे अजून शिक्षण घेत होते. राजकारणाची सावली सुद्धा त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आली होती.

नाही म्हणायला त्यांनी एकेकाळी आपल्या काकांसाठी रस्त्यावर उतरून पप्रचार केला होता पण तेव्हा उदयनराजे यांचं वय होतं फक्त १४ वर्ष. उदयन राजे यांचं बऱ्यापैकी शिक्षण हॉस्टेल मध्ये राहूनच झालं. डुन स्कूल पुढे फर्ग्युसन महाविद्यालय इथे ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सोबत राहून शिकले.

अगदी सुरवातीपासूनचं उदयन राजे यांच्या बद्दलची क्रेझ सातारच्या जनतेमध्ये होती. त्यांनी फक्त ३५ मिनिटात पुण्यातून साताऱ्याला कार ड्राइव्ह केल्याची आख्यायिका अगदी तेव्हा देखील अगदी रंगवून सांगितली जायची.

६ फुट ऊंची, जरब बसवेल अशी धिप्पाड शरीरयष्टी असणाऱ्या उदयन राजे यांची कॉलर उडवण्याची रांगडी स्टाईल, अगदी शत्रूला देखील मदत करण्याचा दिलदारपणा अशा गोष्टींमुळे उदयनराजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच जनतेच्या मनातील ताईत बनत चालले होते.

वडिलांच्या प्रमाणेच राजकारणाची सुरवात त्यांनी सातारा नगरपालिकेपासून केली. १९९१ सालच्या निवडणुकीत त्यांनी अभयसिंहराजे यांच्या विरोधात रयत विकास आघाडीची स्थापना केली. काकांना फक्त आव्हान दिलं नाही तर वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी कोणत्याही पक्षाची मदत न घेता ते नगरसेवक म्हणून निवडून देखील आले. नगरपालिका जिंकू शकले नाहीत पण ही तर फक्त सुरवात होती.

१९९६ सालच्या लोकसभा निवडणुका आल्या. उदयन राजे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. अभयसिंह राजेनी कॉँग्रेस तर्फे प्रतापराव भोसले यांना तर शिवसेनेने हिंदुराव नाईकनिंबाळकर यांना तिकीट दिलं.

खरंतर हा यशवंतराव चव्हाण यांच्या पासूनचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. कार्यकर्त्यांचे जाळे, अभयसिंह राजे यांची प्रचंड ताकद, राष्ट्रीय पातळीवरून येणारी रसद एवढ सगळं असूनही प्रतापराव भोसले यांचं दारुण पराभव झाला.

कधी नव्हे ते शिवसेनेचे हिंदुराव नाईकनिंबाळकर साताऱ्यातून निवडून आले. उदयन राजे यांचा देखील अपक्ष म्हणून पराभव झाला मात्र त्यांनी मिळवलेली 1,13,685 मते ही लक्षणीय होती. राज्याच्या राजकारणात उदयन राजे या नावाची चर्चा तेव्हा पासूनच सुरू झाली.

या सगळ्या दरम्यान उदयन राजे या हिऱ्याकडे एका लक्ष गेलं एका जोहऱ्याचं. तो जोहरी म्हणजे कै. गोपीनाथराव मुंडे. शेटजी भटजीचा पक्ष म्हणून हेटाळणी होणाऱ्या भाजपला राज्याच्या कानाकोपऱ्यात बहुजन समाजात नेण्याच काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. त्यांनी साताऱ्यात एकट पडलेल्या उदयन राजे यांना सहारा दिला.

१९९८ साली अभयसिंहराजे भोसले लोकसभेवर गेले आणि त्यांच्या मोकळ्या झालेल्या विधानसभेच्या जागेवर त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच शिवेंद्रसिंह राजे यांना तिकीट मिळवून दिलं. इथूनच घराणेशाहीचं शीतयुद्ध महायुद्ध बनलं.

उदयन राजेनी भाजपकडून तिकीट मिळवले. राज्यात युती सरकार होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी आपली सगळी ताकद उदयनराजे यांच्या पाठीशी लावली.

पहिल्यांदाच उदयनराजे आणि शिवेंद्र राजे हे दोन चुलत भाऊ एकमेकांच्या अमोरासमोर उभे ठाकले. उदयन राजे राजकरणाचे टप्पे टोणपे खाऊन अनुभवी झाले होते ते शिवेंद्र राजे राजकारणात नवखे होते. निवडणूक अटीतटीची झाली.

अभयसिंह राजे यांच्या घरात खासदारकी आणि आमदारकी अशी दोन्ही पदे देणे साताऱ्याच्या जनतेला पटल नाही, उदयन राजेवर होणऱ्या अन्यायाच्या पाठीशी साताऱ्याने राहायचं ठरवलं आणि अखेर शिवेंद्र राजे यांचा पराभव झाला.

कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर उदयन राजे आमदार बनले, एवढंच नाही तर गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना थेट मंत्री बनवलं. उदयन राजे आपल्या या राजकीय गुरुचे उपकार कधीच विसरले नाहीत.

१९९९ सालच्या विधानसभा निवडणुका आल्या. मागच्या वर्षी फटका खाल्ल्यामुळे अभयसिंह राजे यांनी धडा शिकला व शिवेंद्र राजेंच्या ऐवजी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काका पुतण्या यांच्यातील ही हाय प्रोफाइल लढाई चांगलीच गाजली.

याच निवडणुकीच्या आदल्या दिवशी अभयसिंह राजे गटाच्या नगरसेवकाचा शरद लेवे याचा चक्क खून करण्यात आला. हा खून उदयनराजे भोसले यांनी केला असल्याची चर्चा रंगली.

उदयन राजे यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. चुरशीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या अभयसिंहराजे यांनी पुतण्याचा पराभव केला. राज्यात सुद्धा युतीचा पराभव होऊन कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली होती. आघाडी सरकारने लेवे खून प्रकरण गंभीरपणे घेतले.

पराभूत झालेल्या उदयनराजेंना खून खटल्यात अटक झाली.छत्रपतींच्या वारसदाराला चक्क 22 महिने जेल मध्ये काढावी लागली. हा उदयन राजे यांच्यासाठी कठीण काळ होता. अखेर संपूर्ण तपास झाल्यावर उदयनराजे निर्दोष आहेत असं सिद्ध झालं व त्यांची मुक्तता झाली.

परत आल्या आल्या त्यांनी अभयसिंह राजे यांचा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा पराभव केला व आपण आजून संपलेलो नाही हे दाखवून दिले. अभयसिंह राजे यांच्या गटाचे सेनापतीपद शिवेंद्र राजे यांच्याकडे आले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती , ग्राम पंचायत प्रत्येक निवडणुकीला दोघे चुलत भाऊ त्वेषाने टक्कर देत होते.

मधल्या काळात कृष्णेच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. २००४ साली अभयसिंह राजे भोसले यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मोकळ्या झालेल्या सातारा विधानसभेच्या जागी शिवेंद्र सिंह राजे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं. त्यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीच्या लाटेत उदयन राजे यांचा मोठा पराभव झाला.

2006 सालच्या सातारा नगरपालिका निवडणुकीचा त्रिशंकु निकाल दोन्ही भावांच्या साठी डोळे उघडवणारा ठरला. दोघांचे चुलते शिवाजीराजे भोसले यांनी मध्यस्थी करत राजघराण्यातील एकोप्यासाठी दोघांनाही अदालत वाड्यातून एकत्र आणले. हे मनोमिलन पुढे दहा वर्षे टिकले.

उदयन राजे यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. उदयन राजे लोकसभा आणि शिवेंद्रराजे विधानसभा अशी वाटणी देखील झाली. येणाऱ्या सगळ्या निवडणुका दोघांनी सहज जिंकल्या.

मात्र या बंधुप्रेमाला दृष्ट लागली ती २०१६ सालच्या नगरपालिका निवडणुकीवेळी. दहा वर्षे असलेला एकोपा तोडून उदयन राजे यांनी शिवेंद्र राजे यांच्या वर थेट हल्ला करायचं ठरवलं. खुप वर्षांनी साताऱ्यात पुन्हा हाय व्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

जनतेतून थेट निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्र राजे यांच्या पत्नी वेदांतिका राजे उभ्या होत्या पण उदयन राजे गटाच्या माधवी कदम यांनी त्यांचा सहज पराभव केला. हा पराभव शिवेंद्र राजे यांना जिव्हारी लागला.

त्यांनी उदयन राजे यांच्या विरुद्ध आक्रमक व्हायचं ठरवलं. सुरवात स्वतःच्या मेकओव्हरपासून केली. एकीकडे उदयन राजे यांच्या स्टाईलची तरुणाईत क्रेझ होती तर दुसरीकडे शिवेंद्रराजे यांची भूमिका शांत संयमी अशी होती.

शिवेंद्र राजे यांनी हीच प्रतिमा बदलायाचं ठरवलं. दाढी वाढवून रुबाबदार लुक मध्ये नवे शिवेंद्र राजे सरळ गर्दीला भिडू लागले. सुरुची बंगल्यात युवा कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे होऊ लागले. उदयन राजे यांच्या उडत्या कॉलरला त्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न शिवेंद्र राजे यांनी सुरू केला.

दोन्ही राजेंची भांडणे अगदी टोल नाक्यावर देखील गाजू लागली. शरद पवार यांची शिष्टाई देखील कामी आली नाही. शेलक्या भाषेतील टीकाटिप्पणी मुळे छत्रपती घराण्यातील भाऊबंदकी राज्यभरात गाजू लागली.

Satara: सातारच्या छत्रपती घराण्यात भाऊबंदकी नेमकी सुरू कधी झाली? असा आहे घराणेशाहीचा इतिहास
Congress: लक्ष्य सांगली लोकसभा,विधानसभा; विश्वजित कदमांनी सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत फुंकले रणशिंग

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतील विजया नंतरही उदयन राजे यांनी भाजप प्रवेश केला. मोदी लाटेची ओळख पटून त्यांच्या मागोमाग शिवेंद्रराजे सुद्धा भाजपमध्ये गेले. मात्र त्याच वर्षी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा श्रीनिवास पाटील यांनी मोठा पराभव केला. शरद पवारांची पावसातील सभा आजही आठवली जाते.

आज उदयन राजे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत तर शिवेंद्र राजे आमदार. दोघांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलजमाई केली असल्याची चर्चा होती. मात्र नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ही भाऊबंदकी पुन्हा उफाळून आली आहे.

दोन्ही नेते उपस्थित असताना ऑन कॅमेरा झालेला कार्यकर्त्यांचा राडा, उदयनराजे यांनी तंगड तोडण्याची दिलेली धमकी या सगळ्यात चुलत भावांची ही घराणेशाही राज्यभरात पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भेट घेऊन दोन्ही राजेंना शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी छत्रपती घराण्याच्या भाऊबंदकीचे आणखी किती अंक समोर वाढून ठेवले आहेत याचे उत्तर त्यांना देखील मिळालेले नाही.

टोलवसुलीसाठी, प्रॉपर्टीच्या वादासाठी, निवडणुकीच्या रिंगणात राडा करणारे राजे साताऱ्याच्या विकासासाठी कधी एकत्र येतील हा प्रश्न महाराष्ट्रपुढे आजही कायम आहे हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com