'तुम्हाला कोणालाच सोडणार नाही'; वडिलांकडून चिमुकल्यांवर कोयत्याने वार; शस्त्रक्रियेचे टाके तोडण्याचाही प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Taluka Crime News

रामदासने मयूरी यांच्या शस्त्रक्रिया केलेल्या जागेवरील टाके कोयत्याने तोडण्याचा प्रयत्न केला होता.

'तुम्हाला कोणालाच सोडणार नाही'; वडिलांकडून चिमुकल्यांवर कोयत्याने वार

कऱ्हाड (सातारा) : पत्नीनं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा राग मनात धरून पतीनं दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना गोटे (ता. कऱ्हाड) इथं रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांनी (Police) रामदास बाबासाहेब वायदंडे (वय ४२, रा. गोटे, ता. कऱ्हाड) यास अटक केली आहे. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

श्लोक (वय ५) व शिवम (वय ६) अशी जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. त्यापैकी श्लोक हा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास वायदंडे, आई इंदूबाई, पत्नी मयूरी, शिवम, श्लोक व तीन वर्षांच्या मुलींसह गोटेत राहत आहे. त्याच्या पत्नीनं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यावरून रामदास हा रविवारपासून (ता. १८) वाद घालत होता. सायंकाळी चारपासून घरात पत्नीनं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया का केली, असे विचारत भांडणे करत होता. त्या दरम्यान त्याने शिवम व श्लोकलाही मारले होते. त्याने पत्नीला माहेरी का पाठवले म्हणूनही आई इंदूबाईशी वाद घातला होता. ‘तुम्हाला कोणालाच सोडणार नाही,’ असे तो म्हणत होता.

हेही वाचा: RSS : सरसंघचालक मोहन भागवतांना 'राष्ट्रपिता' म्हणणारे उमर अहमद इलियासी कोण आहेत?

कोयता हातात घेऊन शिवीगाळ

काल रात्री शिवम व श्लोक यांना घेऊन इंदूबाई ह्या घराबाहेर बसल्या होत्या. रात्री नऊच्या सुमारास मुले खेळत होती. त्या वेळी तेथे रामदास आला. तो थेट घरात गेला. त्यामागून इंदूबाई घरामध्ये गेल्या. रामदासने घरातील कोयता हातात घेऊन शिवीगाळ करत ‘तुम्हाला ठार मारतो,’ असे म्हणून शिवम व श्लोकवर कोयत्याने वार केले. त्यात श्लोकच्या डोक्यावर मागील बाजूस कोयत्याचा वार लागल्याने तो गंभीर जखम झाला. शिवमच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार झाला. इंदूबाईंनी आरडाओरडा केल्याने परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी रामदास वायदंडे याच्या हातातील कोयता हिसकावून घेत जखमी चिमुकल्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवले. त्यापैकी श्लोकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिलीप तुपे (रा. मुंढे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करत आहेत.

हेही वाचा: Rajasthan : सचिन पायलटांना रोखण्यासाठी गेहलोतांचा मास्टर प्लान; CM पदाच्या शर्यतीत आता 'ही' 5 नावं

टाके तोडण्याचा प्रयत्न

रामदासला तिसरे अपत्य झाल्यानंतर पत्नी मयूरीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्याला रामदासचा विरोध होता. त्यावरून त्या दोघांत वाद होता. त्याचा राग रामदासच्या मनात होता. रामदासने मयूरी यांच्या शस्त्रक्रिया केलेल्या जागेवरील टाके कोयत्याने तोडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून इंदूबाई यांनी मयूरीला तिच्या माहेरी पाठविले होते, असेही तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Husband Tried To Kill Wife Two Children In Karad Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..