वाहनांचा वेग लावतोय जिवाला घोर

साताऱ्यात रस्ता रुंदीकरणात सुरक्षिततेच्‍या उपाययोजना रामभरोसे
करंजे परिसरातील वर्दळीच्या चौकात सुरू असणारी बेशिस्‍त वाहतूक.
करंजे परिसरातील वर्दळीच्या चौकात सुरू असणारी बेशिस्‍त वाहतूक.Sakal

सातारा - महाड-पंढरपूर रस्‍ता रुंदीकरणामुळे शहरातील मोळाचा ओढा ते मध्‍यवर्ती बस स्‍थानक या मार्गावरील वाहतूक व वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्‍ता रुंदीकरणावेळी सुरक्षिततेच्‍या आवश्‍‍यक उपाययोजना न केल्‍याने करंजे नाका, तामजाईनगर चौक परिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे.

दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्‍या, शहरांतर्गत रस्‍त्‍यांवर आलेला वाहतुकीचा ताण आणि विस्‍तारणाऱ्या शहराला जोडणारे प्रमुख मात्र, दुर्लक्षित मार्गांच्‍या विस्‍तारीकरणाचे काम शासनाच्‍या वतीने हाती घेण्‍यात आले आहे. शहरातून जाणाऱ्या महाड-पंढरपूर या रस्‍त्‍याच्‍या रुंदीकरणाचे कामही गेले काही महिने सुरू आहे. या कामादरम्‍यान बाँबे रेस्‍टॉरंट ते मोळाचा ओढा या मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले. रुंदीकरण पूर्ण झाल्‍याने या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला आहे. वाढणाऱ्या वेगाबरोबरच या मार्गावरच्या वसाहतीतील नागरिकांना दररोज लहान-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागतो आहे.

गेल्या आठवड्यात महानुभाव मठ परिसरात भरधाव चारचाकीने रस्‍ता ओलांडणाऱ्या वृध्‍देस धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्‍या वृध्देचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. हा अपघात व त्यातील वृध्‍देच्‍या मृत्यू‍ने रुंदीकरणामुळे या रस्‍त्‍यावरील निर्माण झालेले धोके पुन्‍हा एकदा अधोरेखित झाले. ते धोके दूर करून नागरिकांच्‍या सुरक्षेला प्राधान्‍य देण्‍यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा पालिकेने पुढाकार घेऊन आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्याची आवश्‍‍यकता आहे.

करंजे येथील स्‍वरूप कॉलनीतील नागरिक तसेच तेथील दुकाने व औद्योगिक वसाहतीतील वाहने अनेकदा चौक ओलांडून महानुभाव मठासमोरील रस्‍त्‍याने जाण्‍याऐवजी प्रमिला मंगल कार्यालयाच्‍या बाजूच्‍या रस्‍त्‍याने करंजे नाक्‍याकडे येतात. विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे तसेच नागरिकांमुळे अनेक वेळा अपघाताचा धोका निर्माण होत असल्‍याचे दिसून येते.

...अशा हव्यात उपाययोजना

करंजे नाका, तामजाईनगर चौक, मोळाचा ओढा येथे सिग्‍नल उभारणे

नागरीवस्‍तीतील मुख्‍य मार्गावर रम्‍बलिंग स्‍ट्रीप तयार करणे

प्रमुख चौकांत दिवस-रात्र सिग्‍नल ब्‍लिंकर बसवणे

धोकादायक वाहने लावणाऱ्यांवर कारवाई आवश्‍यक

ठिकठिकाणी वेगमर्यादेचे फलक लावणे

सहा महिन्यांत शंभर वाहने अपघातग्रस्त

कऱ्हाड - पुणे ते बंगळूर महामार्गावरील वेगवान वाहनांवरील कारवाईत महामार्ग पोलिसांनी मुंबई, पुणे, गोवा व बंगळूरातील आलिशान वाहनधारकांवर कारवाई केली आहे. तीच आलिशान शंभरहून अधिक वाहने अपघातग्रस्त ठरली आहेत. अशाच वेगवान वाहनांकडून दोन कोटींचाही दंडही वर्षा दीड वर्षात वसूल झाला आहे.

महामार्गावरील वाहनांच्या वेगाने सहा महिन्यांत चाळीसहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. शंभर जण जखमी झाले आहेत, तरीही पोलिस करत असलेल्या कारवाईत तो वेग अमर्यादितच आहे, असे जाणवते. महामार्ग पोलिसांनी वेगावरील मर्यादांवर प्रबोधनासह दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असूनही त्याचा इफेक्ट दिसत नाही. महामार्ग पोलिसांनी वर्षा दीड वर्षात २० हजारहून वेगवान वाहनांवर केलेल्या कारवाईत दोन कोटीहून अधिक दंड वसूल केला आहे, तरीही वाहनांचा वेग कमी झालेला नाही. महामार्गावर वाहनांचा ताशी ९० किलोमीटरच्या वेगाला परवानगी आहे. त्यावरील वेगवान वाहने कारवाईच्या कचाट्यात येतात. आटके टप्पा, पाचवड फाटा, वहागाव, बेलवडे हवेली, तासवडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी दंडात्मक कारवाई झाली आहे.

असा झाला दंड

तेरा महिन्यांत अतिवेगवान २० हजार ६६८ वाहनांवरील कारवाईत दोन कोटी ६ लाख ६८ हजारांचा दंड

महामार्ग पोलिसांच्या वर्षभरात ५७ हजार ६०३ वाहनांवर कारवाईत तीन कोटींचा दंड

महामार्गावर वेगाचे उल्लंघन झालेल्या १९ हजार ४९२ वाहनांकडून कोटीचा दंड

जानेवारीच्या अवघ्या महिन्यात एक हजार १७६ वाहनांवर कारवाईत १२ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com