ते देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले; सचिन जाधव अमर रहे!

यशवंतदत्त बेंद्रे
Friday, 18 September 2020

ही दुःखद बातमी कळताच तारळे विभागासह दुसाळे गावावर शोककळा पसरली आहे. हुतात्मा सचिन जाधव यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज (शुक्रवार) रात्री दहा वाजता त्यांचे पार्थिव पुणे येथे विमानाने येणार आहे अशी माहिती जिल्हा सैनिक अधिकारी यांनी कळविली आहे. ​

 

तारळे (जि. सातारा) : देशप्रेमाचा वसा हुतात्मा सचिन संभाजी जाधव यांच्या रक्तातच भिनलेला हाेता. वडील सिमेवर देशाचे संरक्षण करुन निवृत्त झालेले तर भाऊ आजही देशाच्या सरंक्षणासाठी सिमेवर लढत आहे. देशाच्या सरंक्षणाचा जणू दुसाळेतील या जाधव कुटुंबियांनी विडाच उचलला हाेता. परंतु शत्रूशी दाेन हात करताना हाैतात्म्य पत्करलेल्या सचिनच्या शाैर्याचा समस्त सातारा जिल्हावासियांना अभिमान आहे.  

पाटण तालुक्यातील तारळे येथून दहा किलाे मीटर अंतरावर दुसाळे हे डोंगर माथ्यावरील छाेटेसे गाव. जवान सचिन संभाजी जाधव हे शाळेपासूनच धाडसी हाेते. डाेंगर दरीतील जीवनामुळे त्यांचे शरीर काटक हाेते. त्याशिवाय लष्करी सेवेचा वडिलांचा वसा सचिन यांना पुढे चालवयाचा हाेता. त्यामुळेच ते सैन्य दलात भरती झाले.

चीन-भारत संघर्ष : महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

सन 2002 मध्ये भरती झालेल्या सचिन यांचा कार्यकाल गतवर्षी संपला होता. मात्र अजुनही देशसेवा करावी म्हणून त्यांनी दोन वर्षे आपली सेवा वाढवून घेतली होती. ते सध्या 111 इंजिनिअर रेजिमेंट येथे देशसेवा बजावत होते. चार ऑगस्टला ते दीड महिना सुट्टीवर गावी आले होते. चीनच्या सीमेवर हालचाली वाढू लागल्याने सैन्यातून त्यांना पुन्हा बाेलावणे आल्याने ते 27 ऑगस्टला कर्तव्य बजावण्यासाठी परतले. 

वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना लेह लडाख येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चिनी सैनिकांच्या चकमकीत लढत असताना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. ही दुःखद बातमी कळताच तारळे विभागासह दुसाळे गावावर शोककळा पसरली आहे. हुतात्मा सचिन जाधव यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दमदार कामगिरी; कसे पकडले 48 तासांत दराेडेखाेर सांगताहेत एसपी

त्यांचे वडील संभाजी हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. लहान भाऊ सध्या सैन्यातच कार्यरत आहे. त्यांच्या पश्‍चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय, दोन पुतणे व बहीण असा परिवार आहे. आज (शुक्रवार) रात्री दहा वाजता त्यांचे पार्थिव पुणे येथे विमानाने येणार आहे अशी माहिती जिल्हा सैनिक अधिकारी यांनी कळविली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Soldier Sachin Jadhav Martyr In Ladkah Satara News