esakal | ‘जरंडेश्‍वर’वर ‘ईडी’ला पाय ठेवू देणार नाही; आमदार शिंदेंचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

‘जरंडेश्‍वर’वर ‘ईडी’ला पाय ठेवू देणार नाही; आमदार शिंदेंचा इशारा

‘जरंडेश्‍वर’वर ‘ईडी’ला पाय ठेवू देणार नाही; आमदार शिंदेंचा इशारा

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव : जरंडेश्वर (jarandeshwar factory) साखर कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत (ED) जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारखान्यावर ५० हजार ऊस उत्पादक शेतकरी अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत हा कारखाना बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न केल्यास, ईडीने राजकीय खेळातून 'जरंडेश्‍वर' बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी शांत बसणार नाहीत. रस्त्यावर उतरून ईडीला सातारा जिल्ह्यातील (satara district) शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ. कोणत्याही परिस्थितीत कारखान्यावर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही असा इशारा माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी दिला.

वडाचीवाडी (ता. कोरेगाव) येथे झालेल्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार शिंदे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, बाळासाहेब सोळसकर, किरण साबळे, संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र भोसले, रमेश उबाळे, संजय पिसाळ, सागर साळुंखे, सुरेखा पाटील, प्रतिभा बर्गे आदी प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती

ईडी ही राजकीय बाहुली असल्याचे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, 'जरंडेश्‍वर कारखाना हा डॉ. शालिनीताई पाटील यांनी काढला होता, हे मान्य असले, तरी त्यांना तो चालवता आला नाही, हे कटू सत्य आहे. सन २०१० पर्यंत २५०० मेट्रिक टन क्षमतेचा हा कारखाना होता. आज हा कारखाना दहा हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने चालत आहे. वीज निर्मितीसह डिस्टिलरीची उभारणी केली आहे. कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार तयार झाले आहेत आणि ५० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) उच्चांकी दर देणारा आणि वेळेवर पेमेंट करणारा हा कारखाना राजकीय द्वेषातून बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर शेतकरी ते खपवून घेणार नाहीत.

केवळ कोरेगाव, खटाव तालुकेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी या कारखान्यावर अवलंबून असल्याने आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार आहे आणि प्रत्येक तालुक्यात गावनिहाय मोहीम हाती घेतली जाणार आहे.' कोणत्याही परिस्थितीत कारखान्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांना पाय ठेवू दिला जाणार नाही, त्यांना कारवाई करु देणार नाही. वेळप्रसंगी आंदोलन छेडून शेतकरी काय असतो, हे केंद्र सरकारला आणि ईडीला दाखवून देऊ, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी लढा उभारला जाणार असून, त्यामाध्यमातून ईडीला धडा शिकवू, असा इशारा सुनील माने, प्रदीप विधाते, राजाभाऊ जगदाळे प्रा. बंडा गोडसे, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळसकर, किरण साबळे, संदीप मांडवे, सागर साळुंखे, संजय पिसाळ, प्रतिभा बर्गे यांनी दिला. भास्कर कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अरुण माने यांनी आभार मानले.

हेही वाचा: पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

loading image