esakal | पालकमंत्री बाळासाहेब पाटील आता तुम्हीच प्रशासनाचा इलाज करा!

बोलून बातमी शोधा

Hospital Logo
पालकमंत्री बाळासाहेब पाटील आता तुम्हीच प्रशासनाचा इलाज करा!
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : वशिला असेल, हॉस्पिटलमध्ये कोणी ओळखीचे असेल, तर तुम्हाला तत्काळ बेड मिळेल अन्यथा ओळख नसेल तर तुम्हाला बेड न मिळता रुग्णासह नातेवाइकांना घरचा रस्ता धरावा लागेल, अशीच स्थिती सध्या कऱ्हाडमध्ये आहे. सर्वसामान्य रुग्णांना बेड मिळवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांच्या हातापाया पडूनही बेड मिळत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक हताश होत आहे.

पुण्याच्या बरोबरीने कऱ्हाडमध्ये आरोग्य सुविधा मिळतात. त्यामुळे येथे मोठी हॉस्पिटल आहेत. तेथे उपचारासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातीलही रुग्ण येतात. कोरोना काळातही कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, एरम हॉस्पिटल, श्री. हॉस्पिटल, कऱ्हाड हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमधून रुग्णांना चांगली सेवा देत अनेकांना जीवदान दिले आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग दुप्पट- तिप्पट वाढला आहे. सध्या रुग्ण जास्त आणि बेड कमी अशी स्थिती झाली आहे. त्याचा मोठा त्रास सर्वसामान्य रुग्णांना होत आहे. ज्यांच्याकडे वशिला आहे, ज्यांची ओळख आहे, त्यांना तत्काळ बेड मिळत आहेत. मात्र, ज्यांची ओळख नाही, वशिला नाही, त्यांना मात्र बेड मिळवताना मोठ्या अडचणी येत आहेत.

बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा

अनेकांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले जात आहे. अशा खेळात रुग्णाचा जीव टांगणीला लागत आहे. शेवटी एवढे करूनही बेड मिळत नाही, त्यामुळे काही नातेवाइकांना नाईलाजाने रुग्ण घरी घेऊन जावा लागत आहे. अशा स्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने रोज किती, कुठे बेड उपलब्ध आहेत, याची माहिती सोशल मीडियावर देणे आवश्‍यक आहे. सध्याच्या लिंकवर मिळणारी माहिती जुनी असते. त्यामुळे जे बेड दाखवले आहेत, ते खरोखरच भरले जात आहेत का? याचीही खातरजमा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे. तरच सर्वसामान्यांना सहजासहजी बेड मिळतील.

नवीन ऍडमिशन बंद

प्रशासनाने हॉस्पिटलमधील बेड उपलब्धतेसाठी एक स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्याची माहिती डॅश बोर्डवर दिसते. त्यावरून रुग्णालयात विचारपूस केल्यावर तेथील यंत्रणेकडून नवीन ऍडमिशन बंद आहेत. डॉक्‍टरांनी नवीन पेशंट घ्यायचे नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यवस्था करूनही त्याचा उपयोग शून्यच होताना दिसतो. त्यामुळे आता हॉस्पिटलमधील वस्तुस्थिती पाहून बेडची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे वारंवार प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन काेविड 19 रुग्णांची अडचण हाेऊ नये म्हणून सूचना देतात. तरी देखील काेविड 19 रुग्णांसाठी आवश्यक असणारी माहिती डॅशबाेर्डवर व्यवस्थित अपडेट केली जात नसेल तरी मंत्री पाटील यांनी प्रशासनाचा इलाज करावा अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी