esakal | Karad : लसीकरण कमी अन्‌ राजकीय स्टंट जास्त!
sakal

बोलून बातमी शोधा

Karad : लसीकरण कमी अन्‌ राजकीय स्टंट जास्त!

Karad : लसीकरण कमी अन्‌ राजकीय स्टंट जास्त!

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोना लसीकरण वाढविण्याचा पालिकेने निर्णय घेऊन वॉर्डनिहाय लसीकरणाची शिबिरे आयोजित केली आहेत. ती शिबिरेच तेथील स्थानिक नगरसेवकांनी ‘हायजॅक’ केली आहेत. लसीकरणाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोचून राजकीय ‘अजेंडा’ राबवला जातो आहे. त्याची पालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे नगरसेवकांत लसीकरणाच्या माध्यमातून घरोघरी पोचण्याची स्पर्धा लागली आहे. पालिकेच्या शाळा, मिळेल त्या इमारतीत शिबिरे घेतली जात आहेत. त्या शिबिरांची माहिती देणारी रिक्षाच प्रत्येक प्रभागात त्या नगरसवेकांच्या नावासह फिरवली जात आहे. त्यामुळे लसीकरण कमी अन्‌ राजकीय स्टंटच जास्त दिसतो आहे.

शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोना संसर्ग कमी होत असतानाच लसीकरणाचा जोर वाढला आहे. पालिका व नागरी आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण वाढविण्यात येत आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय लसीकरण सुरू आहे. त्याला गती आली आहे. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्ते, संस्था, सेवाभावी संघटनांनी मदत करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आवाहनही करण्यात आले आहे. काही बँकांनीही त्यात पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यात स्थानिक नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांनी जवळपास ती शिबिरे हायजॅक केली आहेत. त्यामुळे पालिकेचे लसीकरणाचे उद्दिष्‍ट साध्य होत असले तरी नगरसवेकांचा राजकीय अजेंडाही या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोचविला जातो आहे.

शिबिरांचे आयोजन केल्याची रिक्षाच प्रत्येक वॉर्डात फिरते आहे. त्या वॉर्डात शिबिराची माहिती देऊन खाली स्थानिक नगरसवेकांचे नावही जाहीर केले जात आहे. त्याशिवाय प्रत्येक लसीकरण केंद्रावर स्थानिक नगरसवेकांतर्फे विविध सुविधा दिल्या जात आहेत. त्यात चहा, बिस्कीटासहित काही ठिकाणी नाश्त्याची सोय केली जात आहे. त्याशिवाय स्थानिक आरोग्य विभागाच्याही मदतीला नगरसवेक व त्यांचे समर्थक हातभार लावून वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

नगरसेवकांना पालिकेतून शिबिराचे शेड्यूल्ड दिले जाते, त्यामुळे अन्य कोणाला काही कळायच्या आतच नगरसेवक वॉर्डात त्यांची रिक्षा फिरवून श्रेय लाटताना दिसत आहेत. क्वचितच काही नगरसेवकांनी स्वतः आरोग्य शिबिरे घेऊन वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न करत शहरात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनीही पोस्ट कोविडचे तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. लोकशाहीचे गटनेते

सौरभ पाटील, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी स्वतंत्रपणे आरोग्य शिबिरे घेतली आहेत, अन्यथा बहुतांशी नगरसवेकांनी पालिकेच्या शिबिरांनाच हायजॅक करून आपलाच अजेंडा पुढे रेटला आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही आता राजकीय स्टंट जोरात होणार आहे, हेच यातून स्पष्ट होते.

लसीकरण पालिकेचे, माहोल नगरसेवकांचा

शहरातील वॉर्डनिहाय होणारे लसीकरण नागरी आरोग्य केंद्र व पालिकेतर्फे होत आहे. मात्र, लसीकरणाचे शिबिर शासनाचे अन् त्या शिबिरात माहोल मात्र नगरसेवकांचा, अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे नगरसेवक त्यांचा राजकीय अजेंडा राबविण्यासाठी व सामान्यांपर्यंत पोचण्यासाठी त्या शिबिरांचा वापर करत आहेत. त्यामुळे त्या शिबिरांवर विरोधकांतर्फे आक्षेप घेतले जात आहेत.

loading image
go to top