
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुर झालेल्या विकास कामांच्या निधीवरुन कऱ्हाड उत्तरमध्ये (जि.सातारा) सध्या श्रेयवाद रंगला आहे.
Karad News : कऱ्हाड उत्तरमध्ये विकासकामांवरुन कलगीतुरा; राष्ट्रवादी, भाजपमध्ये श्रेयवाद
कऱ्हाड - अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुर झालेल्या विकास कामांच्या निधीवरुन कऱ्हाड उत्तरमध्ये (जि.सातारा) सध्या श्रेयवाद रंगला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांत कलगीतुरा सुरु झाला आहे. मतदार संघातील विकास कामे सुचवण्याचा, निधी मागण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणुन आमदारांना आहे. तर काही विकास कामांसाठी थेट गावांना निधी देण्याचे अधिकार मंत्र्यांनाही आहेत. स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र आपल्या नेत्यांमुळेच विकास कामांसाठी निधी मंजुर झाल्याचे बॅनर लावले आहेत. काहींनी पत्रकार परिषदा घेवुनही माहिती दिली आहे. त्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. या श्रेयवादाच्या धुरळ्यात निधी नेमका कुणी आणला? याबाबत सर्वसामान्य लोक मात्र संभ्रमात पडले आहेत.
जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मतदार संघ म्हणुन कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. या मतदार संघावर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. जेष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांनीही या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील हे चार टर्म या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या मतदार संघात कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत मात्र पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला नाही. दहा वर्षीपुर्वी भाजप, शिवसेनेचे अस्तित्वही जाणवण्याइतपत नव्हते.
मात्र गेल्या काही वर्षात आता कॉंग्रेस, शिवसेना वगळता भाजपने या मतदार संघातील पुढाऱ्यांना मोठी ताकद देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपकडुन धैर्यशील कदम, स्वाभिमानी संघटनेकडुन मनोज घोरपडे यांनी लढत दिली. त्यामध्ये आमदार पाटील यांचा मताधिक्याने विजय झाला. मात्र या लढतीमुळे तेथे भाजपने आपली मुळे घट्ट करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार पाटील यांना जेष्ठ नेते शरद पवार यांनी सहकारमंत्रीपद दिले होते. त्याचबरोबर ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुनही कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी विकास कामे सुचवली होती. त्याची पुर्तता होवु लागली आहे.
सध्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सरकार आहे. त्यांच्या माध्यमातुन भाजपचे कऱ्हाड उत्तरमधील पदाधिकारी विकास कामांसाठी निधीची मागणी करत आहेत. त्यांना त्यात यशही येत आहे. त्याचबरोबर स्थानिक आमदार म्हणुन आमदार पाटील यांच्याकडुनही कऱ्हाड उत्तरमधील गावातील विकास कामांसाठी निधीची मागणी केली जात आहे. त्यातच सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यात विकास कामांसाठी शासनाकडुन निधी देण्याची घोषणा केली जात आहे. हा निधी मिळाल्यानंतर ती कामे सुरु होणार आहेत. मात्र हा निधी आमच्याच नेत्यांनी आणला, त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला असा जोरदार कलगीतुरा स्थानिक पुढाऱ्यांकडुन सुरु आहे.
कऱ्हाड उत्तरमध्ये पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. त्याच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांकडुन बॅनरवर आपल्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावुनही निधी संदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर काही पुढाऱ्यांनी थेट पत्रकार परिषद घेवुन आम्ही विकास कामासाठी पाठपुरावा केला आणि निधी मिळवला असे जाहीरपणे सांगण्यात आले आहे. त्याचीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे या श्रेयवादाच्या धुरळ्यात निधी नेमका कुणी आणला ? याबाबत सर्वसामान्य लोक मात्र संभ्रमात पडले आहेत.
कामांसाठी ठराव देण्यावरुनही राजकारण
गावामध्ये विकास कामे घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव घ्यावा लागतो. त्यानंतर त्यासाठी निधीचा प्रस्ताव तयार करुन तो सादर केला जातो. मात्र ज्या पुढाऱ्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे त्यांच्याकडुन विकास कामासाठी ठराव देताना राजकीय पक्षा-पक्षांचा भेद केला जात आहे. त्यामुळे अनेकदा विकास कामांसाठी ठराव मागुणही ते ठराव ग्रामपंचायतीकडुन मिळत नसल्याचे चित्र कऱ्हाड उत्तरमधील काही गावात आहे. त्याचाही परिणाम गावच्या विकास कामांवर होत असल्याचे चित्र आहे.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातील अनेक गावात आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडुन विकास कामांसाठी निधी मंजुर झाला आहे. मात्र विरोधकांकडुन आम्हीच निधी आणला असे सांगुण नारळ फोडण्याचे काम सुरु आहे. बॅनर लावुनही माहिती देण्यात येत आहे. तुम्ही ज्यावेळी निधी आणाल त्यावेळी तुम्ही नारळ फोडावे. विरोधकांनी आमच्या कामाचे श्रेय घेवुन नये.
- देवराज पाटील, अध्यक्ष, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेस
भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या पाठपुराव्यामुळे कऱ्हाड उत्तरमध्ये विकास कामांसाठी निधी मिळाला आहे. २०१९ पुर्वीही आमचे सरकार असताना आम्ही निधी आहे. मात्र त्याचे भुमिपुजन, उदघाटन करण्याचे काम विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केले. सध्या कऱ्हाड उत्तरमधील विकास कामांसाठी आलेल्य निधीचे श्रेय हे आमचेच आहे.
- महेशकुमार जाधव, अध्यक्ष, कऱ्हाड उत्तर भाजप