esakal | मृतदेहावरुन जिल्हाधिका-यांचे रुग्णालयावर कारवाईचे संकेत

बोलून बातमी शोधा

Dead body
मृतदेहावरुन जिल्हाधिका-यांचे रुग्णालयावर कारवाईचे संकेत
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील कोविड रुग्णाचा पन्हाळा तालुक्‍यातील नेबापूर येथील कोविड रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर रुग्णालयाने मृतदेह परस्पर नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला. नातेवाइकांनीही मृतदेह कोविड स्मशानभूमीत आणला. मात्र, पालिकेने त्यावर अंत्यसंस्कारास नकार दिल्याने गोधळ उडाला. काल रात्री उशिरा हा प्रकार झाला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी पोचून त्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अंत्यसंस्कार झाले. मात्र, त्याच वेळी कोविडचा मृतदेह परस्पर नातेवाइकांच्या ताब्यात देणाऱ्या नेबापूर येथील कोविड रुग्णालयावर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी सिंह यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

कुठरे (ता. पाटण) येथील कोविडच्या रुग्णावर पन्हाळा तालुक्‍यातील नेबापूर येथील संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मात्र, त्याचे काल दुपारी निधन झाले. निधनानंतर संबंधित कोविड रुग्णाचा मृतदेह संजीवनी हॉस्पिटलने परस्पर अंत्यसंस्कारास कोणत्याही पत्राशिवाय नातेवाइकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा नातवाइक तो मृतदेह घेऊन पालिकेच्या कोविड स्मशानभूमीमध्ये आले. मात्र, त्यांना तेथे पालिकेने रोखले. मुख्याधिकारी डाके तेथे पोचले. त्यांनी नेबापूर हॉस्पिटलने काही लेखी दिले आहे का, असे विचारले.

सकाळी अकरानंतर किराणा मालासह दारु घरपाेच मिळेल; वाचा नवा आदेश

त्या वेळी संबंधित रुग्णाच्या नातेवाइकाकडे असे कोणतेही पत्र रुग्णालयाने दिले नव्हते. त्या मृतदेहाचा दहनविधी कोणी करायचा किंवा कोणाच्या ताब्यात देत आहोत, त्याचे कोठेही लेखी रुग्णालयाने दिलेले नव्हते. मृतदेहाला कोणतेही रॅपिंग न करता पालिकेच्या दहनभूमी क्षेत्रात आणला गेला, ती गंभीर बाब मुख्याधिकारी डाके यांनी त्वरित जिल्हाधिकारी सिंह यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, निष्काळजीपणा व कोविडचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नेबापूर संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करावी, असा लेखी अहवाल मुख्याधिकारी डाके यांनी जिल्हाधिकारी सिंह यांना आज दिला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला नेबापूरच्या हॉस्पिटलवर कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे नेबापूरच्या संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई प्रस्तावित केली आहे.

'जलसुरक्षा' अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी; शासनाकडून 15 तज्ज्ञांची समिती स्थापन