
कऱ्हाड : शहरातील हद्दवाढ भागात भटक्या कुत्र्यांचा वावर व उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरी वस्तीत सर्रास दिवसरात्र भटकी कुत्री फिरत असल्याने त्यांच्यापासून लहान मुलांसह नागरिक, महिलांनाही धोका निर्माण झाला आहे. दिवसा फिरणारी कुत्री लहान मुलांमागे लागत आहेत. दोन वर्षांपूर्वी शिक्षक कॉलनी परिसरातील एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला होता. तेथील तरुणांनी प्रसंगावधान राखून मुलाला वाचवले. अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे सावट आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्यावरच अथवा एखादी दुर्घटना घडल्यावरच पालिकेला जाग येणार का? असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.