मराठा क्रांती मोर्चाची मलकापुरात बुधवारी विद्यार्थी परिषद

सचिन शिंदे
Monday, 28 September 2020

विद्यार्थी परिषदेत विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी जाणून घेत भविष्यात कोणती भूमिका घ्यायची? हे या विद्यार्थी परिषदेत निश्‍चित केले जाणार आहे.

कऱ्हाड : मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी (ता.30) विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात अशी विद्यार्थी परिषद प्रथमच मलकापूरमध्ये होत असून शैक्षणिक प्रवेश अथवा नोकरीच्या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत या परिषदेत विचारविनिमय होणार आहे.
 
मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती मिळाल्याने संपूर्ण राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजबांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कऱ्हाड तालुकाही त्याला अपवाद नाही. नऊ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाली. केंद्र सरकारसह राज्य शासनाने योग्य भूमिका न मांडल्यानेच ही वेळ आल्याचा दावा संपूर्ण राज्यात मराठा बांधवांकडून केला जात आहे. कऱ्हाड तालुक्‍यात यापूर्वी मराठा समाजबांधवांनी केंद्र सरकारसह राज्य शासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन केले आहे. या विषयावर पुढे काय भूमिका घ्यायची, याबाबत दोन ते तीन वेगवेगळ्या बैठकाही झाल्या आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी विविध समित्या स्थापन करून जबाबदाऱ्यांचे विभाजन करण्यात आले होते.

फारकत घेतली म्हणजे दावणीला बांधलो गेलाे नाही : विनोद बिरामणे
 
त्याचवेळी विद्यार्थी परिषदेचे आयोजन करून शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी तीन वाजता मलकापुरातील सोनाई मंगल कार्यालयात ही विद्यार्थी परिषद घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांना आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थी परिषदेत विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी जाणून घेत भविष्यात कोणती भूमिका घ्यायची? हे या विद्यार्थी परिषदेत निश्‍चित केले जाणार आहे.

एकतीस हजारांपैकी साडेपाच हजार रुग्णांना मिळाला जनआरोग्यचा लाभ

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Taluka Maratha Kranti Morcha Organised Student Meeting Satara News