पैसे थकीत ठेवणे पडले महागात; कऱ्हाडातील जमिनी हाेणार सरकार जमा

हेमंत पवार
Thursday, 21 January 2021

अनेकांनी दंड भरलाच नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजाही चढवण्याची कार्यवाही करण्यात आली.

कऱ्हाड : अवैध वाळू, मुरूम, माती यासह गौणखनीज उत्खनन प्रकरणी तालुक्‍यातील अनेकांना दंड झाला. मात्र, त्यातील अनेकांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजा चढला. त्यांनी तो दंडच न भरल्याने त्यांची जमीन सरकारजमा करण्याच्या नोटिसा तहसीलदारांनी दिल्या. त्यानंतरही दंड न भरल्याने एक कोटी 46 लाख 66 हजार 275 रुपयांच्या वसुलीप्रकरणी तालुक्‍यातील 21 जणांची जमीन सरकारजमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
 
कृष्णा नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या, साठा करणाऱ्या आणि अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांना तहसील कार्यालयाने दंड केला होता. त्याचबरोबर अवैधरीत्या मुरूम, मातीचेही उत्खनन, वाहतूक केली जाते. त्या प्रकरणीही दंड करण्यात आला आहे. मात्र, अनेकांनी दंड भरलाच नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजाही चढवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तालुक्‍यातील 85 जणांच्या सातबारावर चार कोटी 55 लाख सात हजार 360 रुपयांचा बोजा चढवला आहे. त्यांच्या सातबारावर संबंधित दंडाचा बोजा चढवल्यानंतरही त्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यांना ती जमीन सरकारजमा करण्याची नोटीस तहसीलदार यांनी पाठवली होती. मात्र, तरीही  21 जणांनी मुदतीत एक कोटी 46 लाख 66 हजार 275 रुपयांचा दंड न भरल्याने त्यांची जमीन सरकारजमा करण्याचे आदेश दिले आहेत.

तुम्हाला बजेट समजत नाही? हा लेख वाचा!

त्यामध्ये किरण पाटील (येरवळे), विक्रम शिंदे (ओंड), अधिक सावंत (ओंडोशी), शंकरराव थोरात (कार्वे), संदीप बोराटे (शिरवडे), दत्तात्रय माने (मालखेड), संग्राम थोरात (शिरवडे), निवास बाबासाहेब थोरात (शिरवडे), नीलेश जगदाळे (शिरवडे), सुनील जगदाळे (शिरवडे), दादासो डुबल (शिरवडे), आनंदा थोरात व आण्णासाहेब थोरात (शिरवडे), प्रमोदसिंह जगदाळे व हिंदुराव जगदाळे (शिरवडे), प्रवीण पिसाळ (नडशी), रामचंद्र ऊर्फ चंद्रकांत थोरात (नडशी), रवींद्र थोरात (नडशी), संजय थोरवडे (वारुंजी), सुवर्णा खालकर व चार (खालकरवाडी), विनायक पवार (बामणवाडी) व उत्तम देसाई (बामणवाडी) यांचा त्यामध्ये समावेश असल्याचे तहसीलदार वाकडे यांनी सांगितले. दरम्यान तहसीलदारांच्या या कारवाईमुळे अनेकांचा धाबे दणाणले आहेत.

दहा कोंबड्यांचा मृत्यू; कुडाळकरांत चिंता, माणवासियांना दिलासा

गगन भरारी! जागतिक विक्रमासाठी साताऱ्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Tashildar Issued Notice To 21 Businessman Satara Marathi News