कऱ्हाड : कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजवीर राहुल ओहाळ

कऱ्हाड : कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला ठार

कऱ्हाड : घराशेजारी खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यास भटक्या कुत्र्यांनी भरदिवसा अक्षरशः फाडत उसाच्या शेतात नेले. येथील वाखाणमधील जगताप यांच्या वस्तीनजीक दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. राजवीर राहुल ओहाळ असे दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने धक्का बसल्याने मुलाची आई सौ. वैशाली यांना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या घटनेनंतर शहरासह हद्दवाढ भागातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. १३ वर्षांपूर्वीही वाखाण भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. घटनास्थळासह पोलिसांच्या माहितीनुसार ः वाखाण भागात शेवटची जगताप यांची वस्ती आहे. त्या परिसरातील शेतात राहुल ओहाळ व त्यांची पत्नी वैशाली शेतात कामाला जातात. त्यांचा मुलगा राजवीर हा वस्तीलगत खेळतो. शेताशेजारीच वस्तीत त्यांचे घर आहे. त्या भागात भटक्या कुत्र्यांचाही त्रास भयंकर आहे. नेहमीप्रमाणे राहुल हे शेतात ट्रॅक्टरवर काम करत होते. त्यांची पत्नी वैशाली या पलीकडच्या शेतात भांगलण्यास गेल्या होत्या.

सकाळपासून राजवीर हा दोन वेळा घरी जाऊन पुन्हा त्यांच्याकडे खेळायला आला होता. डोळ्यादेखत खेळणाऱ्या राजवीरवर दबा धरून बसलेल्या भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. किमान १५ कुत्र्यांचा कळप राजवीरच्या अंगावर आला. ती घटना राहुल, वैशाली यांच्यापासून पलीकडच्या बाजूला घडली. राजवीर याची मानच कुत्र्यांनी जबड्यात पकडली. त्याला उसाच्या रानात फरफटत नेल्याने त्याचा आवाज आला नाही. डोळ्यादेखत खेळणारा राजवीर अचानक गायब झाल्याचे आई- वडिलांच्या लक्षात आले.

त्यांनी घरात जाऊन पाहिले, तर तो तेथेही नव्हता. अखेर राजवीरचा शोध सुरू झाला. शोधणाऱ्यांना उसाच्या शेतात कुत्र्यांची चाहूल लागली. त्यांनी त्या दिशेने पाहिले असता राजवीर त्यांच्या नजरेला दिसताच शोधणारेही हादरले. त्यांनी कुत्र्यांना हटकवले. पोलिस व नगरपालिकेला त्वरित कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर घटनास्थळी आले. राजवीरच्या सर्व अंगावर कुत्र्यांच्या चाव्याचे व्रण होते. त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Web Title: Karhad Chimukla Killed Dog Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..