
कऱ्हाड : चार हजार मोकाट कुत्री पकडण्यासाठी निविदा, नगरपंचायतीचा अॅक्शन प्लॅन तयार
कऱ्हाड : भटक्या कुत्र्यांची संख्या शहरात चार हजारांच्या घरात पोचली आहे. नगरपालिकेचे निर्बीजीकरण बंद आहे. मोकाट कुत्र्यांचा केवळ सर्व्हे करून पालिका गप्प आहे. काहीच उपाययोजना राबवत नसल्याने मोकाट कुत्र्यांची डोकेदुखी नागरिकांसाठी वाढली आहे. कुत्र्यांचा मोकाट वावर अनपेक्षित आहेच. मात्र, तितकाच तो घराबाहेर पडणाऱ्यांना धोक्याचा व जीव घेणारा ठरत आहे.
मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात किमान पंचवीसहून अधिक लहान मुलांसह नागरिकांवर हल्ले केले आहेत. पालिका कुत्र्यांना पकडून त्यांची निर्बीजीकरण करते. मात्र, तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आहे. मध्यंतरी पालिकेने त्याची निविदाही काढली होती. मात्र, पुन्हा त्याच्या पेमेंटवरून निविदांचा घोळ आहे. ठेकेदाराला त्याची रक्कम देण्यावरूही पालिकेत मतमतांतरे आहेत. त्यामुळे कुत्र्यांचे निर्बीजीकरण रखडले आहे. काही जण शहरात कुत्रीही आणून सोडत असल्याच्या तक्रारी पालिकेत आहेत. उपनगरातून वाढलेली मोकाट
कुत्र्यांची संख्या तेच दर्शवते. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या चार हजारांवर पोचल्याचा पालिकेचा सर्व्हे आहे.
स्वच्छ अभियानात कचरा कोंडाळीमुक्त शहर करण्यात पालिकेला यश आले. त्या माध्यमातून उकिरड्यांवर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या कमी झाली. मात्र, अलीकडच्या काळात मोकाट कुत्र्यांची घटलेली संख्या पुन्हा नव्याने वाढते आहे. कोयना, कृष्णा नदीच्या काठावर मोकाट कुत्री दिवसभर फिरतात. रात्री पुन्हा तीच कुत्री शहरातील नागरी वस्तीकडे येतात. शहरासह उपनगरांत मोकाट कुत्र्यांच्या नाहक त्रासाला नागरिक वैतागले आहेत. मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात किमान ३५ जणांचा चावा घेतल्याचा अंदाज आहे.
आजअखेरचे निर्बीजीकरण.
नगरपालिकेने २००८ मध्ये एक हजार ५००, तर २०१९ मध्ये किमान दोन हजार ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. मध्यंतरी ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले होते. त्यानंतर ती मोहीम सध्या तरी थंडावली आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात नाही, असा अंदाज आहे.
Web Title: Karhad Tender Catching Stray Dogs Action Plan Nagar Panchayat Prepared
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..