esakal | पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात; शेतकरी हवालदिल
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

पावसाकडे चातकाप्रमाणे आस लागलेला बळिराजा हवालदिल झाला आहे.

पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात; शेतकरी हवालदिल

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (सातारा) : पावसाने अनेक दिवस उघडीप दिल्यामुळे अतिवृष्टीच्या पावसात (Heavy Rain) वाचलेली व हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. आठवड्यात पाऊस झाला नाही तर खरीप पिकांचे मोठे नुकसान होणार असून, पावसाकडे चातकाप्रमाणे आस लागलेला बळिराजा (Farmer) हवालदिल झाला आहे.

चक्रीवादळाने यावर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवात झाली. चक्रीवादळ व पडलेला मुसळधार पाऊस यामुळे खरिपाच्या पेरण्यासाठी तयार केलेली शेते वाहून गेली होती. तत्काळ त्याची डागडुजी करून शेतकऱ्यांनी मॉन्सूनचा पाऊस (Monsoon Rain) सुरू होण्याअगोदर खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. पेरणीनंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली. त्या कालावधीत भांगलण, कोळपणीची कामे उरकून शेतकऱ्यांनी खरीप पिकांत जान आणली होती. मात्र, २२ जुलैच्या दरम्यान अतिवृष्टी झाली. यामध्ये अनेक पिके वाहून गेली, ओढ्यांनी पात्र बदलले, नदीकाठावरील पिके चाटून गेली, डोंगर खचून हजारो एकर क्षेत्रावर भराव पसरला आणि शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले.

हेही वाचा: कोरोना संकटातही 'या' कारणामुळे फुटपाथवरील विक्रेते 'खूश'

अतिवृष्टी थांबली आणि पुन्हा शेतकरी वाचलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी राबू लागला. मात्र, अतिवृष्टीबरोबर मॉन्सूनचा पाऊस गायब झाला. सलग २० ते २५ दिवस पावसाने दीर्घ उघडीप दिली असून, कमी कालावधीतील भात आणि सोयाबीन, उडीद, भुईमुगासह इतर कडधान्य पिकांना पावसाची गरज होती. परंतु, पाऊस पडत नसल्याने अतिवृष्टीच्या तडाख्यात वाचलेली पिके करपू लागली आहेत. त्याचा एकूण परिणाम उत्पन्नावर होणार आहे. पाऊस पडेल, या आशेवर बळिराजा चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. या दोन दिवसांत पाऊस पडला नाही तर मात्र, संपूर्ण खरीप हंगाम वाया जाईल, अशी भीती निर्माण झाल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे.

loading image
go to top