esakal | कोरोना संकटातही 'या' कारणामुळे फुटपाथवरील विक्रेते 'खूश'
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2021

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असल्यामुळे घरगुती सजावटीही जोरात सुरू आहे.

कोरोना संकटातही 'या' कारणामुळे फुटपाथवरील विक्रेते 'खूश'

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : गणेशोत्सवात (Ganeshotsav 2021) वातावरण प्रसन्न आणि प्रतिष्ठापनेचा परिसर आकर्षक राहावा, यासाठी नागरिकांची सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून, सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गर्दीने भरून जात आहे. फुले, आकर्षक रंगविलेली पुठ्ठ्यांची सुंदर मखरे, फुलांच्या महिरपीची कमान, पडदे, तऱ्हेतऱ्हेचे विद्युत दिवे बाजारात विक्रेत्यांनी मांडले आहेत. कोरोनाच्या (Coronavirus) सावटातही नागरिकांचा खरेदीचा उत्साह कमी झाला नसल्याने फुटपाथवरच्या किरकोळ विक्रेत्यांनी समाधानाचा नि:श्‍वास टाकला आहे.

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असल्यामुळे घरगुती सजावटीही जोरात सुरू आहेत, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. घरातील मंडपासाठी आता चकचकीत टिकल्या लावलेले पडदे, झालरी अगदी तयार स्वरूपात मिळत आहेत. सजावटीचा फार त्रास नको यासाठी नागरिक छतासह तयार असलेल्या मंडपांना पसंती देत आहेत. हे मंडप मोठ्या दुकानांत तसेच फुटपाथवरही उपलब्ध आहेत.

हेही वाचा: लोकसभेनंतर महापालिका निवडणुकीत भाजपची बाजी

विद्युत दिव्यांच्या माळा, दिव्यांच्या पट्ट्या, फिरत्या आणि रंगीत विविध आकारांचा प्रकाश टाकणारे दिवे शंभर रुपयांपासून उपलब्ध आहेत. गणेशमूर्तीभोवती, मखराभोवती फुलांच्या सजावटीसाठी आता खऱ्या फुलांसारखी दिसणारी कापडी आणि प्लॅस्टिकची फुले आणि त्याच्या विविध आकारांच्या कमानी विक्रेत्यांनी मांडल्या आहेत. गणरायाला सुंदर मखर असायलाच हवे, ही प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे कलाकारांनी सुंदर मखरे बाजारात आणली आहेत. थर्माकोलला बंदी असल्याने आता जाड पुठ्ठ्यांची, कागदी फुलांनी सजविलेली आणि आकर्षकपणे रंगविलेली मखरे बाजारात आली आहेत.

हेही वाचा: कास पठारला दोन दिवसांत पाच हजार पर्यटकांची भेट

रोजीरोटीचा प्रश्‍न मिटला

सण किंवा उत्सव फुटपाथवर रांगोळीपासून ते पूजा साहित्य विकणाऱ्या शेकडो कुटुंबांचा काही काळाचा का होईना रोजीरोटीचा प्रश्‍न मिटवत असतो. मात्र, गेले दीड-दोन वर्षे कोरोनामुळे किरकोळ विक्रेत्यांना विविध बंधनांमुळे मोठ्या त्रासाच्या जीवनाला सामोरे जावे लागले आहे. गणेशोत्सव आणि शिथिल झालेली बंधने यामुळे बाजारात ग्राहक वाढले आहेत. त्यामुळे फुटपाथवरचे विक्रेते सध्या खूष आहेत.

loading image
go to top