मनोज शेंडेंना मिळणार सातारा पालिकेचे उपाध्यक्षपद

गिरीश चव्हाण
Tuesday, 27 October 2020

प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय राखत काम करण्यावर शिंदे यांचा भर होता. उपनगराध्यक्षपदी काम करण्यास मिळालेल्या कालावधीत अनेक लोकोपयोगी कामे केली असून, कामकाजाबाबत समाधानी असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली.

सातारा : सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार साेमवारी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे सोपवला. नूतन उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा लवकरच आयोजिण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली.

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुमारे 15 महिन्यांपूर्वी किशोर शिंदे हे विराजमान झाले होते. सुरुवातीला शिंदे यांना एक वर्षाचा कालावधी या पदावर काम करण्यासाठी सातारा विकास आघाडीकडून देण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांना नंतर सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळाली. कोरोनाचा कहर कमी होत चालल्यानंतर शिंदे यांना बदलण्याच्या हालचाली साविआत सुरू झाल्या. यानुसार दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे यांनी साविआच्या पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर त्यांनी किशोर शिंदे यांच्या प्रभागासह इतर ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ केला.

माणदेशात कुजवा रोगाने डाळिंबांचा सडा; शेतकरी चिंतेत

हा प्रारंभ करून दोन दिवस होत असतानाच मंगळवारी शिंदे यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष कदम यांच्याकडे सुपूर्द केला. शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्‍त झालेल्या पदावर मनोज शेंडे यांची वर्णी लागण्याचे संकेत साविआच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले.

राज्यात पुन्हा एकदा हाय होल्टेज; तळ कोकणातल्या राजकारणावर प्रभाव
 
कोरोना कालावधीत प्रभागासह शहराच्या विविध भागांत उपाययोजना राबविण्यावर श्री. शिंदे यांनी भर दिला होता. प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय राखत काम करण्यावर शिंदे यांचा भर होता. उपनगराध्यक्षपदी काम करण्यास मिळालेल्या कालावधीत अनेक लोकोपयोगी कामे केली असून, कामकाजाबाबत समाधानी असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली.

कोरोनाबाधित 132 महिलांची प्रसूती सुरक्षित; डॉक्‍टर-परिचारिका ठरले देवदूत

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kishor Shinde Resign From Vice Presidentship Of Satara Municipal Council Satara News