

Krishna River Pollution
esakal
सांगली : ऐन गणेशोत्सवात कृष्णा नदी प्रदूषित होण्यासाठी प्रशासनासोबत सत्ताधारीदेखील कारणीभूत आहेत. नदीतील पाणी प्रवाहित ठेवण्यासाठी त्यांनी पाटबंधारे विभागाशी कुठलाही पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळेच दूषित पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करण्याची वेळ आली आहे. येत्या काळात कृष्णा नदीत होणारे प्रदूषण न थांबविल्यास शेरीनाल्यावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कृष्णा नदीत बोटीद्वारे दूषित पाण्याची पाहणी केली. शेरीनाल्यासह इतर ठिकाणी मिसळत असलेल्या दूषित पाण्याची ठिकाणे पाहिली. यावेळी गंभीर बाबी समोर आल्या. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. सरकारी घाटाजवळील नाल्याची पाईप फुटली आहे.
अमरधाम स्मशानभूमी शेजारील नाल्यातून थेट दूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. यावर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.’ श्री. चव्हाण म्हणाले, ‘वालचंद अभियांत्रिका महाविद्यालयास महापालिकेने दूषित पाण्याबाबत आढावा घेण्यास सांगितले होते. अहवालात त्यांनी सांगली परिसरातून कृष्णा नदीत रोज ६८ एमएलडी दूषित पाणी मिसळले जात आहे. यात कारखान्याच्या दूषित पाण्याचाही समावेश आहे. कृष्णा प्रवाहित ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी लेखी मागणी संबंधित विभागाला केलेली नाही. सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींनी या विषयावर आढावा बैठक घेण्याचे औदार्य दाखविले नाही.
सत्ताधाऱ्यांचे प्राधान्य नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे असले पाहिजे.’ ‘पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ५९२ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. जिथे पुराचे पाणी येत नाही, तिथेही हा पैसा खर्च होणार आहे. नदी प्रदूषणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला रोज १ लाख ६० हजार रुपयांचा दंड केला आहे. दरवर्षी सहा कोटी रुपयांचा दंड महापालिकेच्या ‘एक्सो’ खात्यात भरावा लागत आहे. सत्तेत आल्यापासून रस्त्यावर पॅचवर्क आणि मुरूम टाकण्याचेच काम सुरू आहे.
सत्ताधारी पाणीप्रश्नाला का हात घालत नाही? प्रत्येकवेळी प्रशासनाला दाढेला देऊन सत्ताधाऱ्यांनी सुटका करून घेऊ नये. नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करावेत.’ असे चव्हाण म्हणाले. पाहणी दौऱ्यात नगरसेवक राजेश नाईक, मयूर पाटील, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, बिलकीस बुजरुक, अश्विनी कदम, पाणीपुरवठा विभागाचे कुलकर्णी, पर्यावरण विभागाचे गुजराथी, अग्निशमनचे सोनोने उपस्थिती होते.
प्रकल्प मार्गी लावा महापालिकेच्या वखारभाग आणि सांगलीवाडी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनुक्रमे २२ आणि ३ ‘एमएलडी’चे नगरविकास विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी धूळ खात पडून आहेत. याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
सांगली : प्रदूषित पाण्याची पाहणी करताना महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, मयूर पाटील, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, बिलकीस बुजरुक, अश्विनी कदम आणि महापालिकेचे अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.