सातारा : कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

दाट धुके व अनियमित थंडीचा परिणाम; भांडवली खर्च वाया जाण्याची भीती
onion
onionsakal

गोडोली : गेल्या दोन महिन्यांपासून पडत असलेले दाट धुके, अनियमित थंडीमुळे सातारा जिल्ह्यात कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. भांडवली खर्च वाया जाणार अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

onion
विवाहितेच्‍या खूनप्रकरणी खेडमधील चौघांवर गुन्‍हा

जिल्ह्यातील सातारा, वाई, कोरेगाव, खंडाळा, माण, खटाव, फलटणसह इतर तालुक्यांत रब्बी हंगामात पाणस्थळ जमिनीबरोबरच कोरडवाहू जमिनीत यावर्षी अवकाळी पाऊस झाल्याने कांद्याची लागण बऱ्यापैकी झालेली आहे. दोन महिन्यांपूर्वी लावलेल्या कांद्याच्या रोपांना लिंबाएवढ्या आकाराचे कांदे लागलेले आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे कांद्यावर करपा रोग पसरला आहे.

त्यामुळे कांद्याची पात पिवळसर पडून संपूर्णतः करपली आहे. त्याचा कांद्याच्या वाढीवर परिणाम होत आहे. काही शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली असली तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नाही. उशिरा लागण केलेली रोपे सध्या वाढीच्या मोसमात आहेत. त्यांच्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. सध्या दररोज वातावरणात बदल जाणवतो आहे. सलग थंडी पडत नसल्यामुळे त्याचा कांद्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झाल्याचे आनेवाडी (ता. जावळी) येथील प्रगतशील शेतकरी कल्याण फरांदे यांनी सांगितले.

सातारा तालुक्यातील कोरडवाहू जमिनीत सर्रास सरी व वाफा पद्धतीने लागण केलेली आहे. तर कोरेगाव तालुक्यातील किन्हई, चंचळी, अंबवडे, हिवरे, भाडळे, शेंदुरजणे, खेड, जळगाव, सातारारोड परिसरामध्ये वाफे पद्धतीने कांद्याची लागण केलेली आहे. सध्या गरजेप्रमाणे पाणी देणे, वर खतांच्या मात्रा देणे व औषध फवारणीत शेतकरी गुंतलेले आहेत. महाग असलेली कांद्याची रोपे घेऊन त्यावर खतांचा व औषधांचा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न निघणार नाही, अशी सध्या स्थिती आहे.

onion
सातारा : भालवडीत अंत्यसंस्कारावरून वाद

गरवा कांद्याची मागणी पुढील काळात वाढणार असली तरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कमी कालावधीत चार पैसे शेतकऱ्यांना हमखास मिळवून देणारे कांदा पीक असले तरी या हंगामात शेतकरी चारी बाजूंनी अडचणीत आला आहे.

-रमेश पवार, शेतकरी, नांदवळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com