esakal | प्रेमकहाणीवर उमटली अक्षतांची मोहोर
sakal

बोलून बातमी शोधा

Rushikesh and Prachi

प्रेमकहाणीवर उमटली अक्षतांची मोहोर

sakal_logo
By
सुनील शेडगे

सातारा - जन्मतः दोन्ही हात नसलेल्या तरुणाशी (Youth) विवाहाचा (Marriage) निर्णय घेणाऱ्या तरुणीला कदाचित सारेच वेड्यात काढतील. मात्र, तरुणीने त्याच्या कर्तृत्वावर, कर्तबगारीवर विश्वास ठेवला. त्यातून दोघेही नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकले. त्यामुळे गेले तीन वर्षे रंगलेल्या प्रेमकहाणीवर सार्थकतेची मोहोर उमटली.

अफाट जिद्दीचा दिव्यांग तरुण अन् त्याच्यावर निखळपणे प्रेम करणारी तरुणी. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असाच हा विषय. त्यातील तरुण म्हणजे ऋषिकेश बाळकृष्ण मोरे. तरुणी म्हणजे प्राची. ऋषिकेश हा फलटण तालुक्यातील दुधेबावी गावचा. प्राची ही सांगवीची. ऋषिकेश हा दिव्यांग आहे. त्याला जन्मतःच दोन्हीही हात नाहीत. मात्र, बालपणापासूनच त्याच्यातील या न्यूनत्वाची जागा अफाट जिद्दीने घेतली. दहावीच्या परीक्षेत त्याने पायाने पेपर लिहित चक्क ९० टक्के गुण मिळविले. संगणकाच्या परीक्षेत तर त्याने १०० पैकी १०० गुण मिळविले. पायाने उत्तमोत्तम चित्रे काढण्यात ऋषिकेश निपुण आहे.

हेही वाचा: माजी नगरसेवकांच्या मनधरणीसाठी नेत्यांची 'फिल्डिंग'

अलीकडच्या काळात संगीत हा त्याचा छंद बनला. त्यातून उत्तम संगीत संयोजक म्हणून त्याची ख्याती झाली. ‘मन चांदणं झालं’, ‘जगण्याच्या खेळामंधी’, ‘लत इष्काची’ यांसारख्या दर्जेदार अल्बमची त्याने निर्मिती केली. त्या निमित्ताने त्याचा प्राचीशी परिचय झाला. प्राची ही उत्तम गाते. ऋषिकेश अन् प्राची फलटणमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकतात. दोघांच्या परिचयाचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. गेली तीन वर्षे त्यांची ही प्रेमकहाणी आकार घेत होती. अलीकडेच प्राचीने ऋषिकेशबरोबर विवाहाचा निर्णय घेतला. अर्थातच त्याला विरोध झाला. मात्र, या विरोधाला न जुमानता प्राची आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

प्रयत्न हेच सामर्थ्य...

ऋषिकेश हा दै. ‘सकाळ’च्या ‘उपक्रमशील शिक्षक’ समूहाचे सदस्य बाळकृष्ण मोरे यांचा मुलगा. ऋषिकेशकडे असलेले प्रयत्नाचे सामर्थ्य त्यांनी आरंभीपासूनच ओळखले. त्याला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळेच तो संगीताच्या क्षेत्रात यशस्वी ठरला आहे. प्राचीच्या रूपाने त्याचे आयुष्य पुढे घेऊन जाणारी सहचारिणी लाभली आहे.

loading image
go to top