Video : नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे ''सौ चुहे खाकर..बिल्ली चली हज को''

अभिजीत खूरासणे
Friday, 18 September 2020

पुढील वर्षी निवडणुका आहेत. अजुनही वेळ गेलेली नाही तुम्ही आलात तर तुमच्यासह नाही आलात तर, तुमच्या शिवाय जनतेची सेवा करण्याचे व्रत आम्ही सोडणार नाही असेही नगरसेवक शिंदे यांनी ठणावून सांगितले.

महाबळेश्वर : नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ''सौ चुहे खाकर..बिल्ली चली हज को ''..अशी अवस्था त्या बारा नगरसेवकांची झाली असुन त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे असा प्रति टोला नगरसेवक कुमार शिंदे ऑनलाईन सभेस विरोध केलेल्या 12 नगरसेवकांना लगावला आहे. यातील काही नगरासेवकांच्या बेकायेदशीर बांधकामांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
''कोविड 19'' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करणे व शहरातील कोरोना रूग्णांना ऑक्‍सीजन बेड व व्हेंटीलेटर सुविधा पुरविण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पालिकेची ऑनलाईन सभा नगराध्यक्षा स्वप्नली शिंदे यांनी काही दिवसांपुर्वी बोलावली होती. परंतु पालिकेतील 12 नगरसेवकांनी या सभेला विरोध करून नगराध्यक्षांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले. या आरोपांचे खंडन करताना नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नगरसेवकांचा आज (शुक्रवार) आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. हे बारा नगरसेवकांच्या गटाचे प्रमुख म्हणुन काम पहात असलेले उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांची निवडुन येण्याची पात्रता नव्हती. यापुर्वी तीन वेळा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यावेळी ते आमच्या समूहात आल्यानेच नगरसेवक बनले हे ते विसरलेत. त्यांना उपनगराध्यक्ष कोणी केले याचाही सोईस्कर विसर त्यांना पडला असेल परंतु जनता विसरलेली नाही.

चीन-भारत संघर्ष : महाराष्ट्रातील जवान हुतात्मा 

उपाध्यक्ष अफजल सुतार, नासिर मुलाणी व रविंद्र कुंभारदरे हे आपली बेकायेदशीर बांधकामे व काळे धंदे लपविण्यासाठीच नगरसेवक होतात असा आरोप करून कुमार शिंदे या तिन्ही नगरसेवकांच्या बेकायदेशीर बांधकामाची  सिटी सर्व्हे क्रमांकांसह माहितीच पत्रकार परिषदेत दिली. या सर्व बांधकामांची चाैकशी करावी असा अर्ज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी करणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

पोलीस भरती रद्द करा; सातारचे राजे सरकारवर भडकले!

देशात लॉकडाउन जाहीर होण्यापुर्वीच कोरोनाचा वाढता धोका ओळखुन नगराध्यक्षांनी नागरीकांची बैठक घेऊन महाबळेश्वर सर्वात प्रथम पर्यटकांसाठी बंद केले. शहर संपुर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. तसेच आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचा निर्णय घेतला. नगरवासियांना जीवनावश्‍यक वस्तूंची किट, घोडे व्यवसायिकांना मदत देण्यासोबतच शहर कसे सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न केले. एकीकडे देश कोरोनाने होरपळत असताना महाबळेश्वर शहरात चार महिने कोरोनाचा शिरकाव झाला नाही याचा विरोधकांना विसर पडला आहे.

घर खरेदीदारांत कहीं खुशी, कहीं गम; दरवाढीचा सर्वसामान्यांना धक्का!

गेली चार वर्षे या बारा नगरसेवकांनी आमच्या कोणत्याही निर्णयाला विरोध का केला नाही अथवा ठरावा विरोधात जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार का केली नाही हे प्रथम जनतेला सांगावे. आमदार मकरंद पाटील यांनी दिलेले जीवनावश्‍यक वस्तूंची किट स्वत:च्या नावाने शहरात वाटले ही यांची पात्रता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेला दिलासा मिळेल असा कारभार करणे आवश्‍यक असताना विरोधक राजकारण करीत आहेत. पुढील वर्षी निवडणुका आहेत. अजुनही वेळ गेलेली नाही तुम्ही आलात तर तुमच्यासह नाही आलात तर, तुमच्या शिवाय जनतेची सेवा करण्याचे व्रत आम्ही सोडणार नाही असेही नगरसेवक शिंदे यांनी ठणावून सांगितले.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahableshwar Corporator Kumar Shinde Addressed Media Satara News