पावसाने बटाटा गेला वाहून; पुसेगाव, विसापुरात मोठ्या प्रमाणात हानी

पावसाने बटाटा गेला वाहून; पुसेगाव, विसापुरात मोठ्या प्रमाणात हानी

विसापूर (जि. सातारा) : पुसेगावसह (ता. खटाव) परिसरात दर वर्षीप्रमाणे हजारो एकरवर शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेतलेले असून, त्याचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणी योग्य झालेले बटाटा पीक पूर्णपणे वाहून गेले आहे, तर काही ठिकाणी शेतातच सडले असून, निसर्गाने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने पुसेगाव येथील प्रकाश मानसिंग जाधव या शेतकरी बांधवाचे पूर्ण तयार झालेले बटाटा पीक वाहून गेले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील खेड-मंचरनंतर बटाटा पिकासाठी पुसेगाव भाग राज्यात प्रसिद्ध आहे. पुसेगावसह परिसरात यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बटाटा पिकाची लागण केली होती. अनेक समस्या व संकटाचा सामना करीत खरिपांच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली होती. बटाटा पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध बॅंकांचे कर्ज, सोसायटी, हात उसनवारी करून भांडवल उपलब्ध केले होते; परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला असून, त्यांच्या श्रमावर पावसाने पाणी फेरले आहे. 

दरम्यान, येथील बहुतांशी क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेल्याने जमिनीचा पोतही खराब झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील सर्व मेहनत वाया गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तेव्हा महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. 

मी दोन एकरवर बटाट्याची लागण केली होती. पिकासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी असा एकूण एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च झाला आहे. तारेवरची कसरत करून हे पीक पूर्ण तयार झालेले असताना ते पावसाच्या पाण्यात वाहत असताना पाहून अतिशय दु:ख झाले, तसेच पावसाने अडीच-तीन लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. 

-प्रकाश जाधव, नुकसानग्रस्त शेतकरी, पुसेगाव 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com