esakal | Satara : मालोशी-घाटेवाडी रस्त्यावर दरड कोसळली; अनेक गावांचा तुटला संपर्क
sakal

बोलून बातमी शोधा

दरड कोसळली

मालोशी-घाटेवाडी रस्त्यावर दरड कोसळली; अनेक गावांचा तुटला संपर्क

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : मालोशी ते पाडेकरवाडी दरम्यानच्या घाट रस्त्यात आज पहाटे भली मोठी दरड कोसळली. मोठ्या प्रमाणावर दरड रस्त्यावर पसरली असल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. यामुळे पाडेकरवाडी, घाटेवाडी, डोणी, मोरेवाडी व पवारवाडी आदी गावांचा तारळेशी संपर्क तुटला आहे. यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

मालोशी ते घाटेवाडी हा घाट रस्ता गेली काही वर्षे दरडग्रस्त भाग बनला आहे. तारळी धरणाच्या परिसरातील हा भाग असल्याने येथे कायम अतिवृष्टी होते. मॉन्सूनच्या तडाखा येथे सर्वात जास्त असतो.

हेही वाचा: मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे

यामुळे येथील घाट रस्त्यांवर सातत्याने दरडी कोसळल्याच्या घटना घडतात. बांधकाम विभाग कधी तत्परतेने त्या दरडी हटवते, तर कधी काही दिवस नागरिकांना संपर्कहीन राहावे लागते. त्यामुळे घाटाला दरडींचे ग्रहण लागले आहे. हा घाट आता दरडप्रवण क्षेत्र बनला आहे. जुलै महिन्यात झालेल्या प्रचंड पावसात देखील दरडी पडल्या होत्या. आताही परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.

मालोशी आळी ते पाडेकरवाडी दरम्यानच्या अवघड वळणावर आज पहाटे मोठी दरड कोसळली. ती रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. स्थानिकांनी बांधकाम विभागाला कळवले असून, आज दरड काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, सध्यातरी काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाडेकरवाडी, घाटेवाडी, डोणी, मोरेवाडी व पवारवाडी आदी गावांचा तारळेशी संपर्क तुटला आहे.

loading image
go to top