
मेकॅनिक आणि नियंत्रक होणार चालक, वाहक; कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत निर्णय
कऱ्हाड : एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटेना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा विचार करून आता एसटी प्रशासनाने बस मार्गावर आणण्यासाठी महामंडळाच्या उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकीच काहींना चालक व वाहक करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत चालकांमधून झालेले सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस व प्रवासी वाहतुकीचा परवाना असणाऱ्या मेकॅनिकना चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. (Satara ST Strike News)
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
एसटीच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेला संप गेल्या अनेक दिवासांपासून सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतरही कर्मचारी ऐकत नाहीत म्हटल्यावर श्री. खोत व श्री. पडळकर यांनी त्यातून माघार घेतली. मध्यंतरी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीही तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही त्यातून तोडगा निघालेला नाही. कर्मचारी अजूनही काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बहुतांश बसची चाके जागेवरच आहेत.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
परिणामी एसटीला कोट्यवधींचा तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांच्यावर दररोज पायपीट करण्याची वेळ आली आहे. त्याचा विचार करून एसटीची चाके मार्गावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाकडून वेगवेगळे मार्ग अवलंबण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता एसटीकडून जे चालक पदोन्नतीने सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस झाले आहेत, ज्या मेकॅनिकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे अशा कर्मचाऱ्यांना चालक म्हणून काम करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर वाहकांमधून बढती झालेल्या वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चालक-वाहकांना प्रशिक्षणही देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने एक आदेश जारी केला आहे.
३०० रुपये अतिरिक्त भत्ता मिळणार
ज्या सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस व प्रवासी वाहतुकीचा परवाना असणाऱ्या मेकॅनिक यांचा संप काळात चालक म्हणून वापर केला जाईल, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्यात येईल. त्यांना महामंडळाकडून ३०० रुपये अतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचारी चालक-वाहक म्हणून काम करण्यास तयार होतील, असाही एसटी प्रशासनाचा कयास आहे.
Web Title: Mechanic And Controller Driver Conductor Decision Until Strike Ends
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..