esakal | ..तर ग्रामपंचायतीत मिळणाऱ्या दाखल्यांनाही मुकावे लागणार!

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat
..तर ग्रामपंचायतीत मिळणाऱ्या दाखल्यांनाही मुकावे लागणार!
sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईलच. परंतु, आता ग्रामपंचायतीतून मिळणाऱ्या दाखल्यांनाही मुकावे लागणार आहे. कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी गोंदवलेकरांनी हा आगळा वेगळा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथेही रोजच नवीन रुग्ण आढळत आहेत. याशिवाय परिसरातील किरकसाल, गोंदवले खुर्द, वाघमोडेवाडी येथेही रुग्णसंख्या वाढत आहे. लोधवडे व नरवणे ही गावे तर कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. गोंदवले बुद्रुक हे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने बाधित परिसरातील लोकांची वाढती वर्दळ धोकादायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी सरपंच जयप्रकाश कट्टे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या वेळी उपसरपंच संजय माने, ग्रामविकास अधिकारी टिळेकर, तलाठी प्रमोद इनामदार, पोलिस पाटील आशा भोसले, कृषी सहायक अशोक आघाव, पर्यवेक्षिका भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक; 'आरोग्य'वर मृत्यूदर कमी करण्याचे 'टार्गेट'

प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांच्या देखरेखीखाली कोरोना योद्‌ध्यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी असे सांगून सरपंच श्री. कट्टे म्हणाले, ""कोरोनाबाधितांची संख्या गावात वाढत असल्याची बाब गंभीर आहे. ही परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य करू.'' उपसरपंच संजय माने म्हणाले, ""विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करावी. कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून कोणतेच दाखले दिले जाणार नाहीत.'' वेताळबाबा मंदिर परिसरात सार्वजनिक पाणवठ्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी नळांची संख्या व पाण्याची वेळ वाढवावी. लोकप्रबोधनासाठी गावात ध्वनिप्रक्षेपकावरून सूचना द्याव्यात. तसेच त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपस्थित सदस्यांनी दिल्या.

स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कामगारांना मदत द्या : नरेंद्र पाटील

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट भयानक असून, यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोर पालन करून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.

-जयप्रकाश कट्टे, सरपंच, गोंदवले बुद्रुक

Edited By : Balkrishna Madhale