सिद्धनाथ यात्रेसह फलटणची राम यात्रा यंदाही रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनाथ यात्रेसह फलटणची राम यात्रा यंदाही रद्द
सिद्धनाथ यात्रेसह फलटणची राम यात्रा यंदाही रद्द

सिद्धनाथ यात्रेसह फलटणची राम यात्रा यंदाही रद्द

म्हसवड : ओमिक्रॉन (कोरोना) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संकटामुळे देवदिवाळीस रविवारी (ता. ५) येथील श्री सिध्दनाथ देवस्थानची रथ मिरवणुकीसह भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्वरी देवस्थानच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत प्रत्येक वर्षी केली जाते. देवदिवाळीस रथ मिरवणुकीने यात्रा करण्याची परंपरा आहे. गेल्या वषीर्ही कोरोनाच्या संसर्गामुळे येथील वार्षिक यात्रा व रथोत्सव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर काही महिने मंदिरही भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाने दर्शनास परवानगी दिली आहे.

हेही वाचा: शिवस्मारकावर कोट्यवधी खर्च करा पण... - विश्वास पाटील

परंतु, ओमिक्रॉन (कोरोना) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संकटामुळे यंदाही रथ मिरवणुकीसह यात्रा भरविण्यास प्रतिबंध करीत फक्त स्थानिक भाविकांनाच काही अटी, शर्तींवर रिंगावण पेठ मैदानात एकाच जागी रथ उभा ठेऊन दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. येथील रिंगावण पेठ मैदानात भरणाऱ्या यात्रेसह म्हसवड नगरीस प्रदक्षिणा घालत ‘श्रीं’च्या रथ मिरवणुकीस प्रतिबंध घातल्याबाबतचे आदेश काल रात्री उशिरा तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी जारी केले.

फलटणची राम यात्रा यंदाही रद्द

कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी फलटणच्या प्रसिद्ध राम यात्रा व रथोत्सवास परवानगी नसल्याचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले. मात्र, आवश्यक धार्मिक विधींना व भाविकांना नियम पाळून दर्शनासाठी श्रीराम मंदिर खुले राहणार आहे. संस्थान काळापासून सुरू असलेल्या येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेस प्रतिवर्षी राज्याच्या विविध भागातून हजारो भक्त येतात. दर वर्षी देव दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगरप्रदक्षिणा होते. यंदा रविवार (ता. ५) रथोत्सव आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे रामयात्रा व रथोत्सवास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. यंदाही यात्रा अगदी तोंडावर येऊन पोचली, तरी प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसून न आल्याने यंदा रथोत्सव होणार असल्याची आशा अनेक भाविकांना लागली होती; परंतु आज प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी अधिकारी व श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची बैठक पार पडली. त्या वेळी प्रांतांनी यात्रेबाबत निर्देश दिले.

हेही वाचा: वानखेडेंची इमेज सिंघम अशी बनवली गेली, पण...; मलिकांचे अनेक खुलासे

यात्रा व रथोत्सवास परवानगी नसल्याने दर वर्षी यात्रा काळात फेरीवाले व दुकानदारांकडून लावण्यात येणाऱ्या स्टॉल्सला यंदाही बंदी घालण्यात आली असून, हा आदेश डावलून स्टॉल लावणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर परिसरात १४४ कलमान्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असून, श्रीराम मंदिर व यात्रा समितीला केवळ आवश्यक धार्मिक विधी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यात्रेच्या दिवशी गजानन चौक ते श्रीराम मंदिर ते मंडई या परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात येणार आहेत. भाविकांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे; परंतु कोविडचे दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शन घेता येणार आहे.

Web Title: Mhaswad Shri Siddhnath Devachi And Phaltan Ram Yatra Canceled This Year Satara District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraPhaltanMhaswad
go to top