
सांगलीच्या नेत्यांनी दुष्काळी भागासाठी टेंभूचे पाणी संघर्ष करुन मिळवलं; पण..
जलसंपदा मंत्र्यांचा 'दुष्काळी भागा'साठी मोठा निर्णय; शरद पवारांनीही पाळला 'शब्द'
दहिवडी (सातारा) : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माण-खटावच्या दुष्काळी भागासाठी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) माध्यमातून मोठा निर्णय घेतलाय. टेंभू लाभक्षेत्रालगतच्या माण-खटावमधील ४८ गावांमधील १३,१२६ हेक्टर क्षेत्रासाठी २.५० टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. तसेच खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी माण-खटावमधील (Maan-Khatav) जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द पाळला असून प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आलंय.
सांगलीच्या नेत्यांनी सांगलीतील दुष्काळी भागासाठी टेंभूचे पाणी संघर्ष करुन मिळवले. मात्र, अनेक वर्षे माण-खटावला टेंभूचे पाणी मिळत नव्हते. प्रभाकर देशमुख हे गेली चार वर्षे शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने टेंभूच्या पाण्यासाठी पाठपुरावा करत होते. प्रभाकर देशमुख यांनी दुष्काळी भागाला पाण्याचं आरक्षण देण्याची, तसेच बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याची योजना शासनाला सादर केली. त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रस्ताव तयार करण्यासाठी टेंभूचे मुख्य अभियंता श्री. गुणाणे यांनी सविस्तर सर्वेक्षण केले. मात्र, पाण्याचे आरक्षण मिळत नव्हते.
हेही वाचा: दाजींचा नादच खुळा! वाघ्या-मुरळीच्या गोंधळात दानवेंनी वाजवला तुणतुणा
प्रभाकर देशमुख यांनी जलसंपदा अधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेवून शरद पवार, तसेच जयंत पाटील यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या. या योजनेसाठी त्यांनी शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) माण-खटावच्या दौर्यावर आले असताना त्यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून जयंत पाटील यांनी माण-खटावच्या दुष्काळी जनतेला दिलासा दिला आहे. सातारा व सांगलीतील दुष्काळी तालुक्यांसाठी एकूण आठ टीएमसी पाणी नव्याने आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी दीड टीएमसी पाणी खटावसाठी तर एक टीएमसी पाणी माणसाठी आरक्षित करण्यात आले आहे. घाणंद येथून तिसऱ्या टप्प्यात हे पाणी उचलले जाणार असून बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी दिले जाणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे माण-खटावची दुष्काळी जनता आभार मानत आहे.
हेही वाचा: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच लालूंनी उचलला भोंग्यांचा मुद्दा; म्हणाले...
प्रशासकीय अनुभव लावला पणाला
"विरळी येथे मागील महिन्यात झालेल्या जाहीर सभेत विरळी भागात टेंभूचे पाणी आम्हीच आणणार असे वचन दिले होते. यानिमित्ताने त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे. यासाठी मी माझा प्रशासकीय अनुभव पणाला लावला. यात मला अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली. या निर्णयाबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचा आभारी आहे."
-प्रभाकर देशमुख, माण-खटाव राष्ट्रवादीचे नेते
Web Title: Minister Jayant Patil Big Decision For Maan Khatav Drought Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..