बोंडारवाडी धरणप्रश्‍न तातडीने मार्गी लावू : जलसंपदामंत्री जयंत पाटील

संदीप गाडवे
Monday, 21 September 2020

बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या व मेढा, केळघर विभागातील 54 गावांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या आठवड्यात बैठकीद्वारे निर्णय घेऊ, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी धरण कृती समितीला दिली.

केळघर (जि. सातारा) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोंडारवाडी धरणाला प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी येत्या आठवड्यात संबंधित विभागाची बैठक घेऊन या धरणाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. 

मुंबई येथे "बेलार्ड पिअर' या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात नुकतीच बोंडारवाडी धरण कृती समितीने जलसंपदामंत्री श्री. पाटील यांना भेटून बोंडारवाडी धरणप्रश्‍नी निवेदन दिले. त्यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या व मेढा, केळघर विभागातील 54 गावांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या आठवड्यात बैठकीद्वारे निर्णय घेऊ, अशी ग्वाही धरण कृती समितीला दिली. या वेळी कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, अशोक पार्टे, गगनगिरी महाराज ट्रस्टचे विश्वस्त संजय शिर्के, दक्षिण मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयराव वाडकर, दीपक मोरे उपस्थित होते.

विराेधकांचे चार नगरसेवक फोडत नगराध्यक्षांनी पुन्हा उपाध्यक्षपद खेचून आणले

यावेळी बोलताना कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी म्हणाले, "मेढा, केळघर विभागाला वरदान ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाचे काम राज्य सरकारने तातडीने मार्गी लावावे. गेल्या अनेक वर्षांपासून जावळी तालुक्‍यातील 54 गावे सातत्याने हा प्रकल्प पूर्ण करावा, यासाठी आग्रही असून, कृती समितीही याबाबत पाठपुरावा करत आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी कृती समितीने मंत्री श्री. पाटील यांची मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Jayant Patil Promise To Solve Bondarwadi Dam Issue Satara News