esakal | Good News : शेणोली-ताकारी मार्गावरील बाजारपेठांना 'अच्छे दिन'; विद्युत रेल्वेच्या वेगाची चाचणी यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Train

Good News : शेणोली-ताकारी मार्गावरील बाजारपेठांना 'अच्छे दिन'; विद्युत रेल्वेच्या वेगाची चाचणी यशस्वी

sakal_logo
By
अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा) : मिरज ते पुणे लोहमार्गावर दुहेरीकरण व विद्युतीकरणाची कामे गतीने सुरू आहेत. प्रायोगिक टप्प्यातील शेणोली ते ताकारी दरम्यानच्या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर विद्युत रेल्वेगाडीच्या वेगाची चाचणीही यशस्वी झाली आहे. कऱ्हाड आणि वाळवा तालुक्‍यांतील शेणोली ते ताकारीदरम्यानच्या सुमारे दहा बाजारपेठांना 'अच्छे दिन' ठरणारा रेल्वे खात्याचा हा प्रकल्प आहे.

मार्च 2023 अखेरीस मिरज ते पुणे दरम्यान 326 किलोमीटर अंतराचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीनंतर हे खाते ऐतिहासिक क्रांतीकडे पाऊल टाकेल. हा प्रकल्प मिरज ते पुणेपर्यंतच्या विकासमार्गांना गती देणारा असाच आहे. 2017 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मिरज ते पुणे लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण याकामी निधीची तरतूद केली. त्यामध्ये विद्युतीकरणास 566 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. संबंधित खात्याने शेणोली ते ताकारीदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रकल्प हाती घेतला. कामाची कालमर्यादा ठरवण्यात आली. त्यानुसार खात्याच्या विद्युत व बांधकाम विभागाने जोमाने कार्य करत वेळेत काम पूर्ण केले.

नितीन गडकरींकडून 460 कोटींचा निधी, ही अभिमानाची बाब; खासदार पाटलांकडून कामाचं कौतुक

गेल्या महिन्यात रेल सुरक्षा आयुक्त ए. के. जैन व विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या उपस्थितीत लोहमार्गाचे निरीक्षण व विद्युत रेल्वेची चाचणी घेण्यात आली. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे इंधनाची बचत, विदेशी मुद्रेची बचत, पर्यावरणाचे रक्षण तसेच जलद, किफायतशीर व स्वस्त सेवा मिळण्यास मदत होणार आहे. शेणोली ते ताकारी दरम्यानच्या पायलट प्रकल्पामुळे शेणोली, भवानीनगर, ताकारी यांसह दहा बाजारपेठांना बळकटी मिळणार आहे. त्याचबरोबर विभागातील शेकडो गावांचे अर्थकारण बदलण्यास प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. मिरज ते पुणे लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण कामातील शेणोली ते ताकारी दरम्यानच्या पायलट कामाची देशपातळीवर नोंद झाल्याने हाही एक नवा इतिहास नोंदवला आहे, हे नक्की.

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top