पाटलांनी राजकीय सत्ता पणाला लावली, त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभीय : रामराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik-Nimbalkar

'मागे कोणी काय केले याला जनता फारसे महत्त्व देत नाही.'

पाटलांनी राजकीय सत्ता पणाला लावली, त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभीय : रामराजे

लोणंद : पाच-सहा तालुक्यांतील ऊसउत्पादकांचे हित लक्षात घेऊन आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) व नितीन पाटील (Nitin Patil) यांनी राजकीय सत्ता पणाला लावून अडचणीतील किसन वीर व खंडाळा साखर कारखाने (Kisan Veer Sugar Factory) वाचवण्यासाठी पाऊल टाकले आहे. राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष (NCP) त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांना ते निश्चितपणे अडचणीतून बाहेर काढतील, असा विश्वास विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी केले.

किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योग लि. खंडाळा- म्हावशी या कारखान्याचा बॉयलर प्रदीपन श्री. निंबाळकर यांच्या हस्ते झाला. त्या वेळी कारखाना स्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत. किसन वीर सातारा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मकरंद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी खंडाळ्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, शशिकांत पिसाळ, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळसकर, डॉ. बाबासाहेब कदम, ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, अरविंद कदम, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक अशोक शिंदे, सुधीर पाटील, किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्यांचे संचालक आदी प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: Satara : मिशीला पीळ मारून काही होत नसतं; उदयनराजेंनी उडवली शिवेंद्रराजेंची खिल्ली

..अन्यथा अशी वेळ आली नसती

रामराजे म्हणाले, ‘‘महसूलमंत्री असताना खंडाळ्याच्या या कारखान्याला जमीन मिळण्यासाठी जे काही सहकार्य करता आले ते केले. पाणी आणि औद्योगिक क्रांती घडवून आणताना खंडाळ्यात साखर कारखाना काढला नाही, ती मोठी चूक झाली अन्यथा अशी वेळ आली नसती. आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी अडचणीतील हे दोन्ही कारखाने वाचवण्याचा राजकीय जुगाराचा खेळ खेळला आहे. हा खेळ यशस्वी होण्यासाठी सर्वांनी त्यांना खंबीरपणे साथ द्यावी. मागे कोणी काय केले याला जनता फारसे महत्त्व देत नाही. मात्र, आता काय होणार हे जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेऊन पाटील बंधूंनी कोणाच्या टीकाटिप्पणीकडे लक्ष न देता काम करत राहावे.’’

हेही वाचा: माझ्याकडचे अंतर्वस्त्र संपलेत, ते आणायला दिल्लीला गेलो होतो; असं का म्हणाले बसंत सोरेन?

'दिलेला शब्द पाळला, याचा आनंद होत आहे'

आमदार पाटील म्हणाले, ‘‘निवडणुकीदरम्यान कोणत्याही स्थितीत कारखाना सुरू करण्याचा दिलेला शब्द पाळला, याचा आज आनंद होत आहे. १ आॅक्टोबरला खंडाळा व त्यानंतर आठवडाभरात भुईंजचा कारखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याची सर्व ती तयारी केली आहे. ऊसतोडणी टोळ्या, वाहतूक व्यवस्था यांना ३ कोटींचा अॅडव्हान्स दिला आहे. खंडाळा कारखान्याचे मेंटेनन्सचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे.’’ सर्व देणी चुकती करून कामगारांचे पगार, शेतकऱ्यांची एफआरपीची थकीत रक्कमही टप्प्याटप्प्याने देण्याचे आश्वासनही या वेळी आमदार पाटील यांनी दिले. या वेळी अध्यक्ष व्ही. जी. पवार, संचालक नितीन भरगुडे- पाटील, चंद्रकांत ढमाळ आदींचीही भाषणे झाली. ‘किसन वीर’चे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दोन्ही कारखान्यांचे सर्व संचालक सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mla Makarand Patil Nitin Patil Is Supported By Ncp Ramraje Nimbalkar At Khandala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..