esakal | वाह, क्या बात है! जावळीत होणार ऑक्‍सिजन प्लांट, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

MLA Shivendrasinharaje Bhosale
वाह, क्या बात है! जावळीत होणार ऑक्‍सिजन प्लांट, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेढा (सातारा) : ऑक्‍सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्‍सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून मेढा (ता. जावळी) येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्‍सिजन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे. या प्लांटसाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच या प्लांटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे.

मेढा येथे ऑक्‍सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून चर्चा केली. या प्लांटसाठी निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून यासाठी लागणारा संपूर्ण निधी शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हा प्लांट उभा राहण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.

खासदार, माजी मुख्यमंत्री, राज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच 'व्हेंटिलेटर'ची वाणवा; रुग्णांचा जीव टांगणीला

प्लांट निर्मितीसाठी मेढा ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्‍चित करण्यात आली असून, या जागेची पाहणी सोमवारी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष कल्पना जवळ, नगरसेवक, मुख्याधिकारी अमोल पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते. ऑक्‍सिजन प्लांट उभारल्यानंतर जम्बो कोविड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रांसह हॉस्पिटल्सना लागणाऱ्या ऑक्‍सिजनची निर्मिती होणार आहे. रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे या प्लांटची लवकर उभारणी करून जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय तातडीने दूर करा, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

Edited By : Balkrishna Madhale