मलकापूर अतिक्रमण मोहिमेस स्थगिती : अशोकराव थोरात

राजेंद्र ननावरे
Wednesday, 28 October 2020

अशोकराव थोरात यांनी या मोहिमेला विरोध केला. त्यांनी ऍड. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या एस. सी. गुप्ता व माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे रिटपिटेशन दाखल केला व त्याच्यावर तात्पुरता मनाई हुकूम मिळवला.
 

मलकापूर (जि. सातारा) : येथील पालिकेच्या वतीने महामार्गाच्या लगतच्या 292 व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या. 48 तासांची मुदतही देण्यात आली होती. ज्या मिळकतदारांनी अतिक्रमण काढले नाही. अशा व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली. पालिकेने चार अनधिकृत अतिक्रमणे मंगळवारी पोलिस बंदोबस्तात काढली, तर उर्वरित 288 जणांना म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. या मिळकतदारांचे म्हणणे नगरविकास विभागाकडे सादर करून संबंधित विभाग जो आदेश देईल, त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार असल्याचे नगरअभियंता शशिकांत पवार यांनी सांगितले.
 
शहरातील महामार्गालगतच्या मिळकतधारकांना नोटिसा बजावल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मंगळवारी तणावपूर्ण वातावरणात कारवाईला सुरुवात झाली. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण, फलक, पत्र्याचे शेड हटवण्यात आले. यामध्ये चार मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांच्यासह 27 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोल्हापूर नाक्‍यावरील दोन शेड जेसीबीच्या साहाय्याने हटवली. मलकापूर फाट्यालगतचे जुने बांधकामही पाडण्यात आले. महामार्गालगत झालेल्या नवीन ट्रॅक्‍टरच्या शोरूमचा फलक हटवण्यात आला. लोटस फर्निचर या शोरुमचा फलकही हटवण्यात आला. या वेळी मिळकतधारकांनी गर्दी करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली होती. 

फेसबूकची जाहीरात पाहून अडकला अंधश्रद्धेच्या जाळ्यात; भोंदूबाबाने लावला चुना 
 

कायदेशीर मार्गाने लढा 

मोहीम सुरू असताना व्यावसायिकांनी अन्याय निवारण समिती स्थापन करून कायदेशीर मार्गाने या विरोधात लढा देण्याचा ठराव केला. अशोकराव थोरात यांनी या मोहिमेला विरोध केला. त्यांनी ऍड. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या एस. सी. गुप्ता व माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे रिटपिटेशन दाखल केला व त्याच्यावर तात्पुरता मनाई हुकूम मिळवला.

जिवलग मैत्रिणींची चटका लावणारी एक्‍झिट

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai High Court Stay On Malkapur Encroachment Movement Says Ashokrao Thorat Satara News