मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन फलटणमार्गे आणू; रणजितसिंह निंबाळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranjit Singh Naik Nimbalkar

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन फलटणमार्गे आणू; रणजितसिंह निंबाळकर

फलटण शहर : देशातील एक लाख ८० हजार कोटींचा महत्त्‍वाकांक्षी मुंबई- हैदराबाद हा बुलेट ट्रेनचा मार्ग फलटण येथून वळवावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. रेल्वेच्या माध्यमातून दळणवळणाद्वारे फलटण तालुक्यातील व माढा लोकसभा मतदारसंघाचा निश्चितपणे आर्थिक विकास होईल, असा विश्वास दर्शवून रखडलेले फलटण-बारामती व फलटण-पंढरपूर हे लोहमार्ग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

येथील प्रांताधिकारी कार्यालयात खासदार निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेची आढावा बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते. बैठकीस रेल्वेच्या डीआरएम रेणू शर्मा, एसआरडीसीएम सुनील शर्मा, डीआरएम मिलिंद वाघोलीकर, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव आदींची उपस्थिती होती. बैठकीत फलटण-पुणे गाडीची वेळ ठरविणे, गती वाढविणे, फलटण-मुंबई रेल्वे सुरू करणे, मुंबई-हैदराबाद ट्रेन फलटणमार्गे वळविणे, फलटण-बारामती मार्गावरील जमिनी हस्तांतरित करणे, फलटण-पंढरपूर लोहमार्गाचा आढावा घेणे यासह विविध महत्त्‍वपूर्ण विषय, समस्यांवर चर्चा झाली.

फलटण-पुणे रेल्वेचा फायदा शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरवर्ग, सर्वसामान्य जनता व प्रवाशांना सर्वार्थाने होण्यासाठी तिची वेळ सर्वांना सोयीची असावी, यास आपले प्राधान्य राहील. या गाडीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक पावले नक्कीच उचलली जातील, असे स्पष्ट करून खासदार निंबाळकर म्हणाले,‘‘ फलटण-मुंबई ही गाडीही लवकरच सुरू करण्यात येईल. फलटण-बारामती लोहमार्गाबाबत जमिनी हस्तांतराबाबतच्या ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. हा मार्ग गेली २३ वर्षे रखडल्याने या भागातील औद्योगिक विकासही रखडला. मुंबई-हैदराबाद हा बुलेट ट्रेनचा केंद्राचा एक लाख ८० हजार कोटींचा महत्त्‍वाकांक्षी प्रकल्प आहे. हा मार्ग फलटण (सस्तेवाडी) मार्गे वळवावा, अशी या भागातील जनतेची मागणी आहे. या रेल्वेमुळे फलटणहून मुंबई अथवा हैदराबाद येथे केवळ ४० मिनिटांमध्ये पोचता येणार आहे.’’

स्थानिक पातळीवर समिती नेमणार

फलटण-पुणे डेम्यू रेल्वेसंदर्भात तिची वेळ बदलावी व गतीमध्ये वाढ व्हावी, अशी मागणी आहे. यासाठी शुक्रवारी (ता. ११) फलटण प्रांताधिकारी कार्यालय येथे व्यापाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येणार आहे. या वेळी स्थानिक प्रशासकीय व रेल्वेचे अधिकारी, पत्रकार, व्यापारी, शेतकरी यांची समिती नेमून ती जी वेळ देईल, त्यानुसार ही रेल्वे चालेल, असे खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mumbai Hyderabad Bullet Train Via Phaltan Ranjit Singh Nimbalkar Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top