कोरेगावात 16 प्रभागांचे आरक्षण बदलले; आजी-माजी नगराध्यक्षांवर 'सुरक्षित प्रभाग' शोधण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koregaon Nagar Panchayat Election

निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या अनेक विद्यमानांवर सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ आलीय.

कोरेगावात 16 प्रभागांचे आरक्षण बदलले

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : नगरपंचायत निवडणुकीसाठी (Koregaon Nagar Panchayat Election) प्रभाग रचना व सर्व १७ प्रभागांचे आरक्षण आज सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे (Rajabhau Barge) यांचा प्रभाग महिला प्रवर्गासाठी राखीव, तर विद्यमान नगराध्यक्षा रेश्मा कोकरे (Mayor Reshma Kokare) यांचा प्रभाग खुला झाला. अनेक नगरसेवकांचे प्रभाग विविध प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांच्यावर सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.

प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी प्रभाग रचना व सर्व १७ प्रभागांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित केले. २०१६ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना व प्रभाग संख्या कायम ठेवण्यात आली आहे. माजी उपाध्यक्षा व विद्यमान नगरसेविका संगीता बर्गे यांच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीचे आरक्षण कायम राहिले आहे. उर्वरित १६ प्रभागांचे आरक्षण बदलले आहे. त्यात प्रामुख्याने राजाभाऊ बर्गे, रेश्मा कोकरे, माजी उपाध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक महेश बर्गे, अर्चना बर्गे आदी प्रमुखांचा समावेश आहे.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेऊन NCP नं 11 जागा केल्या बिनविरोध'

या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या अनेक विद्यमानांवर सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. विद्यमान उपाध्यक्षा मंदा बर्गे यांच्यासह नगरसेविका साक्षी बर्गे व शुभांगी बर्गे या तिघींचे प्रभाग सर्वसाधारण खुले झाले आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रभागांमध्ये संबंधितांच्या कुटुंबातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार १७ पैकी पाच प्रभाग खुले, तर पाच प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन, तर याच प्रवर्गातील महिलांसाठी तीन प्रभाग आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी व याच प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी एक प्रभाग आरक्षित झाला आहे.

हेही वाचा: निवडणुकीत सर्व 'राजे' बिनविरोध होऊन निवांत झाले; पण 'याचं' काय?

सोडत पद्धतीने निघालेले प्रभागनिहाय आरक्षण

सर्वसाधारण (खुला)- प्रभाग क्रमांक तीन, पाच, सात, दहा व १६. सर्वसाधारण महिला- प्रभाग क्रमांक दोन, आठ, ११, १४ व १५. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (खुला)- प्रभाग क्रमांक सहा व १७. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- प्रभाग क्रमांक चार, नऊ व १३. अनुसूचित जाती प्रवर्ग महिला- प्रभाग क्रमांक एक. अनुसूचित जाती प्रवर्ग सर्वसाधारण (खुला)- प्रभाग क्रमांक १२.

loading image
go to top