हर बाजी काे जितना हमें आता है! गावागावांवर सर्वपक्षीयांचा दावा

उमेश बांबरे
Thursday, 14 January 2021

ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय पातळीवर होत नसली, तरी सर्व पक्षीय नेत्यांनी स्थानिक पातळीवर लक्ष घातल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा शिगेला पोचला हाेता .

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात सर्वच पक्षांनी अधिकाधिक ग्रामपंचायती मिळविण्याचा चंग बांधलेला आहे; पण स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतही कुरबरी सुरू असून, राष्ट्रवादी व कॉंग्रेसने भाजपच्या स्थानिक गटांसोबत पॅनेल न करण्याची भूमिका घेतली आहे; पण काही ठिकाणी यालाही छेद बसला आहे. 75 टक्के ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीच्या स्थानिक गटांची सत्ता येईल, असा ठाम विश्‍वास पक्षाचे नेते व्यक्त करू लागले आहेत.  त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस व भाजपच्या वाट्याला नेमक्‍या किती ग्रामपंचायती जाणार याची उत्सुकता जिल्ह्यात आहे.
 
सातारा जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या असून, 624 पंचायतींत स्थानिक गटांत लढती होत आहेत. 98 ग्रामपंचायती या अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींत आता स्थानिक गाव पातळीवरील गटातटांतील पॅनेलच्या माध्यमातून लढती होत आहेत. यावेळेस राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडी झाल्याने या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी सर्व निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला; पण गावपातळीवर पक्षीय लढती होऊ शकत नाही, तरीही काही ठिकाणी राष्ट्रवादी व कॉंग्रेस, कुठे राष्ट्रवादी व शिवसेना, तर कुठे शिवसेना व कॉंग्रेस अशी स्थानिक पातळीवर पॅनेलची रचना झालेली आहे; पण काही ठिकाणी स्थानिक प्रश्‍नांमुळे भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्यात पॅनेल झाल्याचे चित्र आहे.

साताऱ्याचा नादच खुळा! धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया... प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार 
 
प्रत्यक्षात जिल्ह्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या गटासोबत पॅनेल करायचे नाही, असे ठरविले आहे, तरीही दोन चार अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांच्या स्थानिक गटांचीच पॅनेल झालेली आहेत, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या पॅनेलमध्ये लढती होत आहेत; पण तरीही चारही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडून ग्रामपंचायतींवर त्यांच्याच स्थानिक गटांची सत्ता येण्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीकडून तर 75 टक्के ग्रामपंचायतींत त्यांच्याच गटाची सत्ता येईल, असे सांगितले जात आहे, तर कॉंग्रेसकडून शंभर ते 125 ग्रामपंचायतींत त्यांच्या गटाची सत्ता येईल, असा दावा केला जात आहे. शिवसेनेकडूनही 40 ते 45 टक्के ग्रामपंचायतींवर दावा केला जात असून, भाजपकडून मात्र, 50 ग्रामपंचायतींत त्यांच्या स्थानिक गटांची सत्ता येईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय पातळीवर होत नसली, तरी सर्व पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर लक्ष घातल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा शिगेला पोचला. ठिकठिकाणी लागलेले पॅनेलचे बॅनर पाहता जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीकडून सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस, शिवसेना व भाजपच्या वाट्याला नेमक्‍या किती ग्रामपंचायती येणार याचीच उत्सुकता आहे.

भारतीय हाॅकी संघातील मुलींचा युवा वर्गास संदेश; माेबाईलच्या चक्रव्हूयातून बाहेर पडा, मैदानात उतरा!
 

""ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही भाजपचा स्थानिक गट वगळून इतरांशी पॅनेल करण्याचे ठरविले आहे. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादीच्याच दोन स्थानिक गटांत निवडणूक होत आहे. बिनविरोध झालेल्यांमध्ये 90 टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या विचारांच्या असून, उर्वरित निवडणूक होणाऱ्या 75 टक्के ग्रामपंचायतींत या राष्ट्रवादी गटांचीच सत्ता येईल.'' 

- सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 

""कॉंग्रेस पक्षाने महाविकास आघाडील घटक पक्षांच्या स्थानिक गटासोबतच पॅनेलमध्ये सहभाग घेतला आहे, तरीही आमच्या 40 ते 45 टक्के ग्रामपंचायतीत सत्ता येईल, तसेच बिनविरोध ग्रामपंचायतींत 30 टक्के ग्रामपंचायती या कॉंग्रेसच्या स्थानिक गटाच्या विचारांच्या आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक गटासोबतच पॅनेल झालेली आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळेल.'' 

- डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 

 

""शिवसेनेने पहिल्यापासूनच ग्रामपंचायत निवडणुकीची स्थानिक पातळीवर चांगली तयारी केलेली आहे. त्याचा परिणाम दिसत असून, बिनविरोध झालेल्यातील 65 टक्के ग्रामपंचायती या शिवसेनेच्या विचारांच्या आहेत. पाटण, कऱ्हाड, कोरेगाव, महाबळेश्‍वर, सातारा, माण तालुक्‍यांत सर्वाधिक ग्रामपंचायतींत शिवसेनेच्या स्थानिक गटाचे पॅनेल आहेत. त्यामुळे शिवसेनेला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळेल.'' 

- प्रा. नितीन बानुगडे पाटील, शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख 

""भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगली तयारी केलेली आहे. त्यामुळे आम्ही 550 ग्रामपंचायतींत पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत आहोत. आतापर्यंत भाजपचे 470 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के ग्रामपंचायतींत भाजपप्रणित स्थानिक गटाची सत्ता येईल.'' 

- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP BJP Shivsena Congress Claims Of Winning Gram Panchayat Election Satara Marathi News