
लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार दिला जाईल.
Satara Politics : भाजपवाले आम्हाला खासगीत सांगतात, 'यांच्या'बरोबरची युती तोट्यात..; आमदार शिंदेंचा गौप्यस्फोट
सातारा : आपल्या सोयीचे अधिकारी व कर्मचारी यांची बदली करण्याचे षडयंत्र सध्या जिल्ह्यात सुरू आहे. बदल्यांसाठी पैसे घेतले जात आहेत. त्यामध्ये महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात बदल्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या पैशांबाबत येत्या काही दिवसांत पुराव्यासह जाहीर केले जाणार आहे.
बदल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणी पैसे मागितले तर थेट राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यालय किंवा माझ्याशी संपर्क साधावा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बूथ बांधणीबाबतच्या बैठकीनंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘येऊ घातलेल्या निवडणुकांत आपली खरी लढाई आहे. खासदारकी, आमदारकी, झेडपी, पंचायत समिती जिंकून आणायची आहे. त्याकरता पक्षाचे विविध सेल, बूथ कमिट्या सक्रिय करायचे आहेत. बालेकिल्ला कायम राहण्यासाठी कामाला सुरुवात करा. सत्ताधारी हे सत्तेच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत.'
'जिल्हा परिषद कर्मचारी, मंडलाधिकाऱ्यांकडून पैसे मागितले जात आहेत. कर्मचारी बदल्यावेळी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर चॉईसवर बदली होते. मला मिळालेली माहिती अशी, की बदलीसाठी डायरेक्ट पाच लाखांची मागणी केली जात आहे. हे यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात दुर्दैवी आहे. महसूल, पोलिस खाते आणि झेडपी अशा सर्वच ठिकाणी आपल्या सोयीची माणसे बसवली जात आहेत. हे आगामी निवडणुकांत अडचणीचे ठरू शकते.'
'याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सीईओ यांना पुराव्यासकट जाब विचारून जाणीव करून देणार आहोत. एका बाजूला बूथ कमिट्या चांगल्या करत असू, तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती होत असेल तर ही बाब धोक्याची आहे. मी कोल्हापूरला परवा गेलो होतो. तेथे सगळ्या कारखान्यांच्या निवडणुका लागल्या. त्यामध्ये फक्त के. बी. पाटील कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली.'
सत्तेचा किती दुरुपयोग करायचा हे दिसते, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार दिला जाईल. त्यांनी कितीही सांगू ४६, ४२, ४३ खासदार निवडून येणार; पण या वेळी त्यांच्या दहा जागाही निवडून येणार नाहीत. आगामी काळात जिल्ह्यात पक्ष पूर्णपणे सक्रिय होईल, असंही त्यांनी सांगितलं.
त्यांचीशी युती तोट्यात..
अजितदादा व संजय राऊत यांच्यातील वाकयुद्धाबाबत विचारले असता शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री शिंदे गटातील आणि भाजपचे काही नेते ठरवून बोलतात. समोरचा बोलतोय म्हणून आपणही त्याच पद्धतीने बोलले पाहिजे असे काही नाही. आपण तारतम्य पाळून स्टेटमेंट देणे योग्य आहे. महाविकास आघाडीचा चांगला चेहरा लोकांना पाहायला मिळेल. भाजपवाले आम्हाला खासगीत सांगतात, की यांच्याबरोबरची युती तोट्यात आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची चिंता करू नये. कदाचित उद्या शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल. निधी वाटपावरून त्यांच्यात आताच नाराजी आहे.’’