esakal | तीन आमदार, एक खासदार असूनही 'राष्ट्रवादी'ला मिळेना 'जिल्हाध्यक्ष'
sakal

बोलून बातमी शोधा

Nationalist Congress

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. सध्या पक्षाचे तीन आमदार व एक खासदार आहे, तसेच सहकारमंत्री पदही जिल्ह्यातच आहे.

तीन आमदार, एक खासदार असूनही 'राष्ट्रवादी'ला मिळेना 'जिल्हाध्यक्ष'

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदेश उपाध्यक्षा भारतीताई शेवाळे (State Vice President Bharati Shewale) यांनी इच्छुक महिला कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविले आहेत. या पदासाठी आतापर्यंत कऱ्हाड तालुक्यातून केवळ दोनच अर्ज दाखल झालेले आहेत. मागील वेळच्या जिल्हाध्यक्षा व कार्याध्यक्षांनी चांगले काम केल्याने त्यांना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (State President Rupali Chakankar) यांनी प्रदेशवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता नव्याने जिल्हाध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया पक्षाने सुरू केली आहे. (NCP Women Lead Did Not Get A District President Political News)

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. सध्या पक्षाचे तीन आमदार व एक खासदार आहे, तसेच सहकारमंत्री पदही जिल्ह्यातच आहे. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच आमदार होते. मात्र, मागील निवडणुकीत दोन आमदार कमी झाले. पक्षाची ताकद जिल्ह्यात कायम असली तरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत मात्र, उत्साह दिसत नाही. एरवीही पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल तर राष्ट्रवादी भवनात मोठी गर्दी व्हायची. आता काही तुरळक कार्यकर्ते उपस्थित राहतात. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी सक्षम असणारी महिला आघाडीही पदाधिकाऱ्यांतील आपसांतील हेवेदाव्यांमुळे विस्कळित झालेली दिसते. मागील वेळी निवड करताना एक जिल्हाध्यक्षा व दोन कार्याध्यक्षाची नेमणूक करण्यात आली. त्यांना काम करण्यासाठी तालुके वाटून देण्यात आले; पण महिलांतील आपसांतील हेवेदाव्यांमुळे महिला आघाडी एकसंध दिसली नाही. सध्या रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदावर समिंद्रा जाधव यांची प्रभारी जिल्हाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे संघटनात्मक बांधणीचे काम देण्यात आले आहे.

हेही वाचा: SECC Data : 'फडणवीसांकडून सभागृहाची जाणीवपूर्वक दिशाभूल'

प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत तक्रारी गेल्याने त्यांनी मध्यंतरी जुन्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशवर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त झालेले आहे. या पदावर सक्षम व क्रियाशील महिला कार्यकर्त्यांतून जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी प्रदेश उपाध्यक्षा भारतीताई शेवाळे यांनी इच्छुक महिलांकडून अर्ज मागविले आहेत. त्यासाठी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावाने इच्छुक महिलांनी राष्ट्रवादीकडे अर्ज करायचे आहेत. त्यानुसार आतापर्यंत केवळ दोनच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये कऱ्हाडमधील सीमा बोरगावे व कोरेगाव तालुक्यातील देऊर येथून वैशाली सुतार यांचा अर्ज आला आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील माने व प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या अर्जाची संख्या पाहता आतापर्यंत तरी अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: 'दुधात भेसळ करणाऱ्या पांढऱ्या बोक्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन'

सुसंस्कृत व सक्षम महिलेला संधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महिला जिल्हाध्यक्षपदासाठी सुसंस्कृत व सक्षम असलेली महिला कार्यकर्ती हवी आहे. त्यामध्ये नवीन किंवा जुन्या महिला कार्यकर्त्यांनाही संधी मिळू शकणार आहे. त्यासाठी जास्तीतजास्त महिलांनी या पदासाठी अर्ज करावेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त होत आहे.

NCP Women Lead Did Not Get A District President Political News

loading image