जालन्यातील अपहरणकर्त्याची साताऱ्यात सुटका; काेल्हापूर, सांगली, साेलापूरच्या युवकांना अटक

प्रवीण जाधव
Sunday, 17 January 2021

अपहरण झालेल्या युवकाने मंंत्रालयात माझे नातेवाईक आहेत. तुम्हाला नोकरी लावून देता म्हणून त्यांच्याकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे व काही रक्कम जानेवारी २०२० या वर्षात घेतली होती.

सातारा : जालना बसस्थानकातून १४ जानेवार रोजी भरदिवसा सकाळी ११.३० वाजता एका वाहनातून अपहरण केलेल्या एका युवकाची सदर बाजार पोलिसांनी १६ तासात सातारा शहरातून सुखरुप सुटका केली. नोकरी लावून देतो म्हणून झालेली आर्थिक देवाण-घेवाण व मूळ कागदपत्रे परत मिळविण्यासाठी हे अपहरण झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सातारा येथून नऊ संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे.

अपहरणाच्या या घटनेबाबत उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर व पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी माहिती दिली. जालना बसस्थानकातून १४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून काही संशयितांनी एका युवकास मारहाण करत फिल्मी स्टाईलने अपहरण केले होते. बसस्थानकातील प्रवाशांसह आजूबाजूच्या व्यवसायिकांनी हा प्रकार पाहिला होता. माहिती मिळताच सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजश देशमुख पथकासह घटनास्थळी पोहचले. मात्र, कुणाचे अपहरण झाले, ते कुणी व कशासाठी केले याबाबत हा पोलिसांसमोर प्रश्न होता. स्थानिक व्यवसायिकांकडे चौकशी सुरू केल्यानंतर काहींनी अपहरणासाठी वापरलेल्या गाडीचा (एमएच ०४,एफआर ०३५३), असा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पवन घुसिंगे नावाच्या तरुणाने सदर बाजार ठाण्यात येऊन अपहरण झालेला तरुण मित्र असून त्याचे नाव विठ्ठल विजयसिंग जारवाल (राजेवाडी, ता. बदनापूर), असल्याचे सांगितले.

साताऱ्यातील सराफास पुण्यात अटक

विठ्ठल हा एका व्यक्तीचे कागदपत्रे द्यायचे म्हणून बसस्थानकात आला होता, असे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी नातेवाइकांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी ही कारवाई केली.

महाबळेश्‍वरात पहिल्यांदाच दिसले पांढऱ्या रंगाचे शेकरू

गाडीचा पोलिसांनी काढला माग गुन्हा दाखल होताच पोलिसांची तपास पथके रवाना झाली. पोलिसांनी गाडी गेलेल्या रस्त्याचा माग काढत तपास सुरु केला. आरोपी अंबड, पैठण, शेगावमार्गे पुढे, जात असल्याचे लक्षात आल्यानंतर नगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास माहिती कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे सातारा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व पथकाने नाकाबंदी करत संशयित गाडीचा शोध घेऊन अपहरण झालेल्या विठ्ठल जारवाला यांची सुटका करुन सदर बाजार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. 

पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पद्मविभूषणपासून उपेक्षितच!

अशी आहेत आरोपींची नावे

वैभव भेरू पाटील (३१, सतीश विठ्ठल गरांडे (२३) प्रशांत संभाजी पवार (कोल्हापूर), पूष्पराज मारोती जाधव (२६), वैभव भास्कर शेशवारे (३५), मनोहर भास्कर शेशवारे (४२, सर्व रा.सांगली), नितीन बाळू दाढे (२३), गणेश पांडुरंग दाढे (२९), शरद बाळू दाढे (२५ सोलापूर) अशी अपहरण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. या सर्व आरोपींना सदर बाजार पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेऊन जालन्याला नेण्यात आले आहे. 

मूळ कागदपत्रे मिळविण्यासाठी अपहरण 

अपहरण झालेल्या युवकाने मंंत्रालयात माझे नातेवाईक आहेत. तुम्हाला नोकरी लावून देता म्हणून त्यांच्याकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे व काही रक्कम जानेवारी २०२० या वर्षात घेतली होती. काम न झाल्यामुळे अपहरण करणारे संशयित जारवाल यास मूूळ कागदपत्रे परत मागत होते. परंतु जारवाल हा टाळाटाळ करत कागदपत्रे दिल्लीला पाठवली असून, मला ते परत आणण्यासाठी दिल्लीला जावे लागले. विमान तिकीटाकरिता पैसे द्या, असे सांगून वारंवार पैसे उकळत होता. त्यामुळे संशयित तरुणांनी मूळ कागदपत्रे मिळविण्यासाठी विठ्ठल जारवाल याचे अपहरण केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संशयित तरुणांची मूळ कागदपत्रेही हस्तगत केली आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Youth From Kolhapur Sangli Solapur Arrested For Kidnapping Man Who Allegedly Cheated Them With Job Promises Jalna Satara Crime News