शाळा, कॉलेजबाबतचा संभ्रम दूर; सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग होणार सुरू

संजय जगताप
Saturday, 21 November 2020

मार्चपासून बंद असलेल्या शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, येत्या सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर विविध मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका सर्वत्र घेतल्या जात आहेत. पालकांचे लेखी संमतीपत्र घेण्यात येत आहे.

मायणी (जि. सातारा) : येत्या सोमवारपासून (ता. 23) शाळा-कॉलेजमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सर्व शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, असे म्हटल्याने निर्माण झालेली संभ्रमावस्था नुकत्याच काढलेल्या नवीन आदेशाने दूर झाली आहे. आता 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरू होण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. 

मार्चपासून बंद असलेल्या शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, येत्या सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर विविध मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका सर्वत्र घेतल्या जात आहेत. पालकांचे लेखी संमतीपत्र घेण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अँटीजेन रॅपिड टेस्ट घेतल्या जात आहेत. शाळा व्यवस्थापनांनी शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी जोमाने सुरू केली आहे. दरम्यान, शासनाने राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक कार्यक्रम यावरील असणारे निर्बंध उठवले. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले. शालेय शिक्षण विभाग व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामध्ये परस्पर विरोधाभास होता. शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले, तर जिल्हाधिकाऱ्यांनी 30 नोव्हेंबरअखेर शाळा बंद राहतील, असे आदेश दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ व संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्याबाबत समाज माध्यमांतून त्या विरोधाभासी आदेशावर टीका टिप्पणी सुरू झाली होती.

साताऱ्यात 23 नोव्हेंबरला शाळेची घंटा वाजणार; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश 

...अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारबाबत आदेश 

दरम्यान, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधून संभ्रमावस्थेबाबत चर्चा केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज नवीन आदेश काढला. त्यानुसार सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. यावर त्यांनी अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शाळा सुरू होणार की नाही, याबाबतची संभ्रमावस्था दूर झाली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ninth To Twelfth Standard Schools Will Be Started In The State From Monday Satara News