esakal | सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष

जे व्यावसायिक पाच हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांचे संगोपन करत आहेत किंवा 500 पेक्षा जास्त क्षमतेचे अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिले निर्मिती करीत आहेत. त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही डॉ. परिहार यांनी स्पष्ट केले आहे.

सातारकरांनाे! बिनधास्त खा अंडी, चिकन; कुक्कुटपालकांसह पशुसंवर्धन दक्ष

sakal_logo
By
प्रशांत घाडगे/ उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतानाच कुक्कुटपालन व्यावसायिकांना आता "बर्ड फ्लू'ने (Bird Flu) घेरले आहे. या रोगामुळे बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने करार केलेल्या कंपन्याही चिकन व अंडी खरेदी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचे संगोपन करण्यासाठी अतिरिक्त खर्च होतानाच हे पक्षी कंपन्या नेणार का, अशा दुहेरी संकटात कुक्कुटपालन व्यावसायिक अडकले आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्यात सध्या तरी बर्ड फ्लूचा काेणताही धाेका नाही. मांस हे किमान 70 डिग्री सेंटीग्रेडमध्ये शिजवावे आणि मगच खावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे 
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
 
सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी कुक्कुटपालन व्यावसायिक वेगवेगळ्या खासगी कंपन्यांसोबत करार करून सुमारे तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचे संगोपन करतात. त्यानंतर सुमारे 40 ते 50 दिवसांनी संबंधित कंपनी पक्षी घेऊन जाते. मात्र, सध्या "बर्ड फ्लू'मुळे पक्षी व अंड्यांना उठाव नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असताना पुन्हा नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यांत "बर्ड फ्लू'ने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वच पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 250 व्यावसायिकांनी चिकन व अंड्यांच्या पोल्ट्री उभारलेल्या आहेत. हा व्यवसाय उभारण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बॅंकांचे कर्ज काढले असून त्याचे महिना, तिमाही हप्ते सुरू आहेत. मात्र, या व्यावसायिकांचा माल पोल्ट्रीत पडून असल्याने पैसे येण्याचा मार्ग बंद झाल्याने व्यावसायिक हवालदिल झालेत.

कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका?
 
पोल्ट्री व्यवसाय करताना खासगी कंपन्यांसोबत करार करावा लागतो. त्यानंतर संबंधित कंपन्या व्यावसायिकांना पिल्ले सांभाळ करण्यासाठी देतात. त्यामध्ये एका पिल्लाचा सांभाळ करताना सरासरी 90 ते 100 रुपये खर्च येतो. मांसाहारी पिल्लांचा सुमारे 40 ते 50 दिवस सांभाळ केल्यानंतर पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर करार केलेली कंपनी हे पक्षी घेऊन जाते. त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. 

महाबळेश्‍वर : साडे सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहीरीतील गव्यास जीवदान 

पोल्ट्री उभारल्याशिवाय करार नाही
 
कुक्कुटपालन व्यवसायासाठी पोल्ट्री उभी करताना सुमारे 10 ते 15 लाख खर्च येतो. त्यामध्ये तीन हजार पक्ष्यांसाठी आठ ते नऊ लाख, पाच हजार पक्ष्यांसाठी दहा ते 11 लाख, तर दहा हजार पक्ष्यांसाठी सुमारे 15 लाखांपर्यंतचा खर्च हा शेड उभारण्यासाठी येतो. पोल्ट्रीचे पूर्ण काम झाल्याशिवाय पक्षी नेणारी कंपनी शेतकऱ्यांसोबत करार करत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नाईलाजास्तव कर्ज काढून अथवा इतर मार्गातून पैशाची जुळवाजुळव करत पोल्ट्री पूर्णपणे उभी करणे गरजेचे असते. 

शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय उभा करण्यासाठी सुमारे दहा ते 15 लाखांचा खर्च येतो. मात्र, कोरोनाच्या काळात आर्थिक कोंडीतून सुटका होत असताना पुन्हा एकदा "बर्ड फ्लू'चे नवे संकट उभे राहिले आहे. 

- अधिक कंठे, पोल्ट्री व्यावसायिक 

Bird Flu:बर्ड फ्लूमुळे धोका वाढला, राज्यात लवकरच अलर्ट

"बर्ड फ्लू'चा परिणाम चिकन व अंड्यांच्या दरावर झाला आहे. गेल्या काही दिवसांत चिकन व अंड्यांचे दर कमी आले आहेत. सद्य:स्थितीत चिकनचे दर 120 रुपये किलो, तर अंडी प्रति नग 4.70 रुपयांना मिळत आहे. 

- प्रतिश जाधव, अध्यक्ष, अंडी, चिकन समन्वय समिती, सातारा 

सातारा जिल्ह्यास बर्ड फ्लूचा अद्याप धोका नाही; पशुसंवर्धन विभाग दक्ष

सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वेक्षण केले जात असून, पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित पशुसंवर्धन विभागास माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे. 

परंपरागत अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडीचे मास व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित असून, पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये किंवा अफवा पसरवू नये. बर्ड फ्लू रोगाचे विषाणू प्रामुख्याने स्थलांतरित पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यामध्ये आढळून येत आहेत. सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणताही असाधारण पक्षी मृत होण्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यूचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पक्ष्यांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येऊ नये, तशी सूचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तथा तालुका नोडल अधिकारी यांनाही देण्यात यावी. त्यामुळे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.

साता-याला आम्ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नाही : गिरीश बापट 

जिल्ह्यात 19 व्या पशुगणनेनुसार 39 लाख 79 हजार 611 इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे पक्षी फार्ममध्ये जैव सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून पक्ष्यांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. जे व्यावसायिक पाच हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांचे संगोपन करत आहेत किंवा 500 पेक्षा जास्त क्षमतेचे अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिले निर्मिती करीत आहेत. त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही डॉ. परिहार यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top