esakal | 'जरंडेश्वर'नंतर सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस; 96 कोटींच्या कर्जाची होणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank

नुकतीच कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केलीय. या कारवाईनंतर पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या कारवाईकडे गेले.

'जरंडेश्वर'नंतर सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जरंडेश्वर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Factory) सक्तवसुली संचालनालयाने जप्तीची (ED Action on Jarandeshwar Factory) कारवाई केल्यानंतर आता या कारखान्याला कर्ज दिलेल्या सातारा जिल्हा बँकेलाही (Satara District Bank) ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे. यामध्ये कर्ज पुरवठा कशाच्या आधारावर केला आहे, त्याची परतफेड नियमित होतेय का?, याची माहिती ईडीने मागितली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँकेलाच जरंडेश्वरप्रकरणी नोटीस आल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. (Notice Of ED To Satara District Bank In Jarandeshwar Sugar Factory Loan Case Satara Marathi News)

दरम्यान, कारखान्याकडून सक्षम तारणावरच कर्जपुरवठा केला असून त्यांचे कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेवर येत असल्याने आम्ही ईडीच्या नोटिशीला सक्षमपणे उत्तर देऊ, असे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे (Chief Executive Officer Dr. Rajendra Sarkale) यांनी सांगितले आहे. नुकतीच कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या कारवाईकडे गेले. यानंतर ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करून कारवाई मागे घेण्याची मागणी केली. तसेच कारखाना सुरू ठेवण्याची मागणीही केली. हे सर्व सुरू असतानाच जरंडेश्वर कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस (Satara District Central Co-operative Bank) ईडीने नोटीस बजावली आहे.

हेही वाचा: जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई; शेतकऱ्यांसह कर्मचारी आक्रमक

ही नोटीस दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत धडकली असून यानंतर संचालक मंडळासह अधिकाऱ्यांची पळापळी सुरू झाली. मात्र, नोटीसीत ईडीने जरंडेश्वरला कर्ज पुरवठा केल्याबद्दलची माहिती जिल्हा बँकेकडून मागवली आहे. यात कशासाठी व किती कर्ज पुरवठा केला आहे, त्याची परतफेड नियमित होतेय का आदी माहिती बँकेकडून या नोटिसीव्दारे ईडीने मागविली आहे. ज्यावेळी हा कर्जपुरवठा केला त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) हे बँकेचे अध्यक्ष होते. यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, बँकेने जिल्ह्यातील विविध कारखान्यांना कर्जपुरवठा केला आहे. हा कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला आहे.

हेही वाचा: ठरलं! 'ZP'साठी भाजपचा नवा प्लॅन; शेलार घेणार आढावा

त्यानुसार जरंडेश्वर कारखान्याला बँकेने २०१७ मध्ये १३२ कोटींचा कर्जपुरवठा केला होता. सध्या ९६.५० कोटी रूपये येणे बाकी आहे. जरंडेश्वर कारखान्याकडून वेळेत परतफेड सुरू असून या कर्जप्रकरणात सक्षम पुरावे, जामीन व मालमत्ता तारण घेतलेली आहे. ही सर्व माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे ईडीच्या नोटिसीचा कोणताही परिणाम जिल्हा बँकेवर होणार नाही. जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आल्यानंतर शुक्रवारी (ता. ९) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी बँकेत थांबून जरंडेश्वरच्या कर्जप्रकरणाची सर्व माहिती घेतली आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँकेलाच जरंडेश्वरप्रकरणी नोटीस आल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

Notice Of ED To Satara District Bank In Jarandeshwar Sugar Factory Loan Case Satara Marathi News

loading image