
क्रीडा क्षेत्राचा इतिहास लिहायला, वाचायला घेतलं तर खाशाबा जाधव यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हांला पुढे जात येत नाही हे अंतिम सत्य आहे. त्यांना भौतिक अर्थाने मोठे करावे अशी आमची माफक अपेक्षा असल्याचे रणजीत खाशाबा जाधव यांनी स्पष्ट केले.
सातारा : गेले 68 वर्ष महाराष्ट्रातील सुपुत्राचा सुरु असलेला अपमान कधी थांबणार, आमची मानसिकता ढासळली आहे परंतु आम्ही क्रीडाप्रेमींच्या पाठबळावर अखेर पर्यंत लढा देऊच मात्र ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने हा अस्मितेचा प्रश्न केला पाहिजे अशी भावना खाशाब जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव यांनी गाेळेश्वर (ता. क-हाड) येथे व्यक्त केली.
यंदाच्या पद्म पुरस्कारात (Padma Awards 2021) खाशाबा जाधव यांचा समावेश झाला नसल्याने गेली 11 अकरा वर्षे त्यासाठी लढा देणारे त्यांचे चिरंजीव रणजीत यांना आपल्या वडीलांची कामगिरी केंद्र आणि राज्य शासनास दुय्यम का वाटत आहे असा प्रश्न पडला आहे. ई- सकाळला दिलेल्या विशेष मुलखातीत ते म्हणाले, सन 2010 मध्ये दिल्लीत स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या नावाने भव्य स्टेडियम उभारले गेले. त्याच्या उदघाटन समारंभास मला सन्मापुर्वक आमंत्रित केले होते. हा महाराष्ट्र आणि माझ्या जिल्ह्यासाठी अभिमान होता. ते स्टेडियम पाहून मी आनंदीत आणि समाधानी झालो. त्याचवेळीस मी खाशाबांना पद्म पुरस्कार प्राप्त झाला पाहिजे असा निर्धार केला. यासाठी गेल्या 11 वर्षांत माझ्या लढ्यास लोकांचा पाठींबा मिळाला. गेल्या चार वर्षांत तर माझ्या सोबत शेकडो क्रीडाप्रेमी जोडले गेले. यंदाचा आमचा लढा जोरदार झाला.
पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या विषयी वाचा सविस्तर
यंदा 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यापैकी 118 जणांनी चुकुनही संबंधित पोर्टलवर पुरस्कारासाठी (नॉमिनेशन) प्रयत्न केले नसतील. खाशाबांसाठी सुमारे 60 लोकांचे नॉमिनेशन करायला लावले. पाच पन्नास आमदारांचे, तीन चार मंत्र्यांचे, दहा पंधरा खासदारांचे, तीन केंद्रीय मंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस याबरोबरच तीन राज्यपालांच्या शिफारशी घेतल्या होत्या. खरं तर केंद्र शासनास खाशाबांची कामगिरी दुय्यम वाटत आहे का असा प्रश्न रणजीत यांनी उपस्थित केला. ते म्हणाले खाशाबांची कामगिरी आमच्या अपेक्षानूसार झालेली नाही. त्यामुळे पुरस्कार देऊ शकत नाही अथवा देऊ इच्छित नाही तसं आम्हांला केंद्राने सौजन्याने सांगावे. अकरा वर्ष झाली आम्ही लढा देतोय तरी आम्हांला उत्तर दिले जात नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल. मरणाेत्तर पुरस्कार दिला जात नाही असा अध्यादेश (जीआर) असल्याचे गृहमंत्री कार्यालयातून आम्हांला एकदा सांगण्यात आले. परंतु सद्यस्थितीची यादी पाहिल्यानंतर मरणोत्तर पुरस्कार दिल्याचे दिसून येत आहे. एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर संबंधितांच्या कुटुंबियांनी सहा महिन्यात पुरस्कारासाठी मागणी करायची असते असेही सांगितले गेले. मी 13 वर्षाचा असताना खाशाबा सोडून गेले. त्यावेळी आमच्या कुटुंबियांच्या दृष्टीने काही विषय नव्हता. ज्यावेळेस मला समजले त्यावेळीस मी पुर्ण त्वेषाने आणि जोमाने लढा सुरु केला.
पद्म पुरस्कारांची घोषणा, वाचा यादी एका क्लिकवर
सरकाराने पुरस्कारासाठी नियमसुद्धा बदलले यासाठी. यामध्ये उद्योगपती धीरुभाई अंबानी यांना त्यांच्या मृत्यूनंतर पाच सहा वर्षानंतर पुरस्कार दिला गेला. तसेच सुमारे 15 जणांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेल्याची नोंदी आहेत. खाशाबांच्या बाबतीत सापत्नक वागणूक का दिली जात आहे असा प्रश्न क्रीडाप्रेमी मला विचारातात, तेव्हा देखील निरुत्तर होऊन जातो. खरंच खाशाबांची कामगिरी सरस नव्हती का. आपल्या देशास ऑलिंपिकमध्ये दूसरे पदक प्राप्त करण्यासाठी 44 वर्षांची वाट पहावी लागली हे सर्वांनाच माहित आहे. त्यांची कामगिरी कमी का मानावी. आता आमची मानसकिता पुर्णतः ढासळलेली आहे. परंतु आम्ही क्रीडाप्रेमींच्या पाठबळावर शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहोत. दूसरी धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर पद्म विभुषणसाठी शिफारस करायला पाहिजे होती. परंतु शासनाने मरणोत्तर पद्मश्रीसाठी खाशाबांची शिफारस केली. पद्म विभुषणसाठी सुनील गावस्कर, उद्योगपती मुकेश अंबांनी यांची शिफारस केली गेली. पद्म भुषणसाठी माधूरी दिक्षीत, मोहन आगाशेंची शिफारस केली गेली. महाराष्ट्र शासनास खाशाबांची कामगिरी सरस वाटत नाही का असा प्रश्न रणजीत जाधव यांनी उपस्थित केला. यंदा सिंधूताई सपकाळ सोडता अन्य पाच जणांची शिफारस महाराष्ट्र शासनाने केली नाही तरी त्या पाच जणांचे नाव यादीत आले आहे.
महाराष्ट्र सरकारने हा अस्मितेचा प्रश्न केला पाहिजे. आमच्या सुपुत्राचा गेले 68 वर्ष अपमान सुरु आहे. त्यास न्याय मिळावा यासाठी जनरेटा उभा करुन आम्हांला साथ द्यावी असे रणजीत यांनी नमूद केले. ते म्हणाले खाशाबांचे पदक हे जगासमोर आहे. जोपर्यंत भारत देश आहे. तोपर्यंत खाशाबा जाधवांचे नाव अढळ. या देशात लौकिका अर्थाने मोठं होऊन चालत नाही भौतिक अर्थाने मोठ होणे आवश्यक आहे. त्यासाठी पद्म पुरस्काराच्या यादीत त्यांचा समावेश झाला पाहिजे.
Howz The Josh! निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी
दूसरे म्हणजे खाशाबांना पुरस्कार देऊन त्यांना तुम्ही मोठे करीत नाही. पुरस्काराला मोठं करीत आहात तुम्ही हे तुमच्या का लक्षात येत नाही असा प्रश्न उपस्थित करुन क्रीडा क्षेत्राचा इतिहास लिहायला, वाचायला घेतलं तर खाशाबांच्या नाव घेतल्याशिवाय तुम्हांला पुढे जात येत नाही हे अंतिम सत्य आहे. त्यांना भौतिक अर्थाने मोठे करावे अशी आमची माफक अपेक्षा असल्याचे रणजीत जाधव यांनी स्पष्ट केले.