फलटणमध्ये महिलेचा खून; मलठणमधील संशयितास अटक

फलटणमध्ये महिलेचा खून; मलठणमधील संशयितास अटक

फलटण (जि. सातारा) : येथील बस स्थानकाअंतर्गत असलेल्या बारामती स्थानकात वास्तवास असलेल्या 50 ते 55 वयाच्या भिकारी महिलेचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषीमातानगर, मलठण) याला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत माहिती अशी, की बस स्थानकाअंतर्गत बारामतीस जाण्यासाठी छोटेखानी बस स्थानक आहे. या ठिकाणी ऑफिस व लगतच प्रवाशांसाठी बसण्यासाठीचे शेड आहे. कोरोना संसर्गामुळे बस व प्रवाशी संख्या फारशी नसल्याने या ठिकाणी वर्दळ नसते. या शेडमध्ये महिला गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यास आहे. तीला चालता येत नसल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडून मागून घेऊन तीचा उदरनिर्वाह सुरु होता. आज (ता. २) सकाळी सातच्या सुमारास बस स्थानकातील सुरक्षा रक्षक दत्तात्रय सोनवलकर हे स्थानकातील लाईट बंद करीत होते. ते बारामती स्थानकातील लाईट बंद करण्यासाठी आले असता, त्यांना तेथील प्रवाशांसाठी असलेल्या शेडमध्ये एका बाकावर एक 25 ते 30 वयोगटातील व्यक्ती अर्धनग्न पॅंट न घातलेल्या स्वरुपात झोपल्याचे व बाकाखाली फरशीवर 50 ते 55 वयोगटातील महिला पालथ्या अवस्थेत व अर्धनग्न अवस्थेत पडलेली दिसून आली. 

या महिलेच्या तोंडातून व डोक्‍यातून रक्त येत होते. सोनवलकर यांनी हाका मारल्या. परंतू, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर या प्रकाराची कल्पना त्यांनी आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांना दिली. धुमाळ हे सोनवलकर यांच्यासमवेत गेले असता तेथे त्यांना संशयित अविनाश जाधव पळून जाण्याच्या तयारीत असताना काहींनी त्यास पकडून ठेवले होते. त्यावेळी त्याच्या पॅंटवर रक्ताचे डाग होते. त्याची विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव व पत्ता सांगितला. या प्रकाराची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी संबंधित महिलेच्या आजूबाजूस रक्ताचे डाग होते. तिच्या तोंडावर मार लागलेला होता. तीला फरशीवर आपटून अथवा हत्याराने केलेल्या मारहाणीत तीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. 

दरम्यान, घटनास्थळास दुपारी पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथकातील श्वानास तेथे सापडलेल्या कपड्यांचा वास देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळावर आणलेल्या संशयित अविनाश जाधव याच्या जवळ घुटमळले. घटनास्थळी पोलिसांना संशयिताच्या कपड्यासह दारुची बाटली, पेला, डिश आदी साहित्य मिळून आले. या घटनेची तक्रार दत्तात्रय सोनवलकर यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत. दरम्यान, संशयिताने हे कृत्य दारुच्या नशेत केले असून, महिलेवर त्याने अतिप्रसंग केला असण्याची चर्चाही व्यक्त होत होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com